मंडणगडचे धान्य गोदामामुळे शहरात असुविधा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन सादर करताना अ‍ॅड. राकेश साळुंखे, सोबत लुकमान चिखलकर व कार्यकर्ते.
गोदाम स्थलांतराच्या मागणीसाठी अ‍ॅड. राकेश साळुंखे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड शहरात मुख्य चौकानजीक असलेल्या तालुक्याचे धान्य गोदामाच्या इमारतीमुळे वाहतूक कोंडीसह अनेक असुविधेमुळे गोदामाचे भिंगळोली येथील शासकीय जागेत विस्तापित करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राकेश साळुंखे यांनी मुंबई येथे नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून निवेदन सादर केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी याविषयाची दखल घेत सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्याची माहिती अ‍ॅड. राकेश साळुंखे यांनी माध्यमांना दिली.

मंडणगड तालुक्याचे धान्य गोदाम हे नगरपंचायत हद्दीत असून शहराच्या मुख्य चौकात मोक्याच्या ठिकाणी या गोदामाच्या दोन मोठ्या इमारती आहेत. मुख्य चौकात रस्त्यानजीक या इमारती असल्याने शहरात वाहतूक कोंडीची समस्या नियमित झाली आहे. इमारतीच्या आजूबाजूस निर्माण अनेक अस्वच्छतेच्या तक्रारी नेहमीच्याच आहेत. शिवाय धान्य गोदाम तहसिल कार्यालयापासून लांब आहे, त्यामुळे तहसीलच्या अधिकाऱ्यांना नियंत्रणासाठी गैरसोयीची आहे. शहरातील मध्यवर्ती व मोक्याच्या ठिकाणच्या गोदामाची जागा येथील स्थानिक स्वराज्य संस्थेकडे वर्ग केल्यास या ठिकाणी व्यापारी संकुल, बाजारपेठेसाठी ही जागा महत्वपूर्ण ठरू शकते. त्यामुळे नगरपंचायत मंडणगड यांना बाजारपेठेसाठी आवश्यक असलेले जागेची समस्या या गोदामाच्या विस्थापानामुळे दूर होऊ शकते. गोदामाचे स्तलांतरण तहसिल कार्यालय मंडणगड या ठिकाणी उपलब्ध असलेल्या शासकीय जागेत करता येवू शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन सादर करताना यावेळी राष्ट्रवादीचे मंडणगड तालुका युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर उपस्थित होते.