साखरपा (वार्ताहर)
रत्नागिरी मध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो असे सांगून शेकडो लोकांची फसवणूक केली. झालेल्या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. फसवणूक झालेल्या ग्राहकांना अद्याप न्याय मिळालेला नाही. आरजू घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप सापडला नसल्या कारणामुळे या घटनेतील फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येणार आहे. या उपोषणाच्या दिवशी विलास वामन सुर्वे व गौतम गमरे हे मुख्य लोक उपोषणाला बसणार असून त्यांच्या समवेत सुमारे 1200 सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती मिळत आहे.
आरजू कंपनीच्या वतीने अनेक लोकांना व्यवसाय उद्योग सुरू करून देतो असे सांगून रत्नागिरी तालुका तसेच आजूबाजूच्या तालुक्यातील अनेक लोकांनी कंपनीमध्ये गुंतवणूक केली. आणि अक्षरशः या कंपनीने कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध करून न देता गुंतवणूक केलेल्या लोकांची म्हणजेच ग्राहकांची फसवणूक केल्याची घटना वर्ष दोन वर्षांपूर्वी घडली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे. मात्र याचा तपास कशा पद्धतीने चालू आहे हे अद्याप तक्रारदारांना सांगितले जात नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
त्याचप्रमाणे या घटनेतील मुख्य आरोपी का पकडला जात नाही तो कुठे आहे कुठल्या गावात राहतो आहे आणि आमचे सर्व ग्राहकांचे पैसे कसे मिळवून देणार आहेत असे असंख्य सवाल ग्राहकांनी उपस्थित केले असून याच्या निषेधार्थ 15 ऑगस्ट रोजी उपोषण छेडण्यात येणार असल्याची माहिती कोंडगाव येथील संदिप जोयशी यांनी दिली आहे.












