रत्नागिरी –
लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी नगर परिषदेने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत र. ए. सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. ‘टिळक – स्वातंत्र्य लढ्यातील अग्रदूत’ या विषयावर झालेल्या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयीन गटात पहिल्या तीन क्रमांकांवर अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनीच बाजी मारली.
या स्पर्धेत एम.सी.व्ही.सी. शाखेतील कु. मधुरा विजय रावणंग हिने प्रथम क्रमांक, कु. साक्षी संजय हरळीकर हिने द्वितीय क्रमांक, तर शास्त्र शाखेतील कु. आदिती जितेंद्र पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थिनींनी टिळकांच्या राष्ट्रभक्तीचा, स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या योगदानाचा आणि त्यांच्यातील दूरदृष्टीसंपन्न नेत्याच्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यासपूर्ण विचार निबंधातून प्रभावीपणे मांडला.
संत गाडगेबाबा सभागृहात झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात रत्नागिरी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. वैभव गारवे यांच्या हस्ते विजेत्यांचा प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी आणि पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












