दोडामार्ग : प्रतिनिधी
कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘पर्यावरणपूरक बाप्पा स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. घरगुती गणेशोत्सवासाठी ही स्पर्धा असून स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम पारितोषिक ५००० रुपये, द्वितीय पारितोषिक ३००० रुपये आणि तृतीय पारितोषिक २००० रुपये अशी बक्षिसे आहेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी शाडू मातीच्या किंवा पर्यावरणपूरक रंगांच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणे आवश्यक आहे. थर्माकोल किंवा प्लास्टिकचा वापर न करता नैसर्गिक वस्तूंनी सजावट करणे अनिवार्य आहे. गणेशोत्सवा दरम्यान कोणत्याही प्रकारच्या ध्वनी प्रदूषणास प्रोत्साहन देऊ नये. कचरा विलगीकरण, स्वच्छतेचे महत्त्व, ‘माझी वसुंधरा’, ‘पाणी वाचवा’, ‘मुलगी वाचवा’ अशा सामाजिक संदेशांवर आधारित सजावट करणे आवश्यक आहे.
स्पर्धेची नोंदणी १ ऑगस्ट पासून सुरू झाली असून नोंदणीची अंतिम तारीख ६ सप्टेंबर आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करून किंवा नगरपंचायतीच्या कार्यालयात संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.











