तरुणांनो सैन्य दलाकडे वळा : देशाला तुमची गरज
वैभववाडी येथे मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महारक्तदान शिबिर : ११८ जणांनी केले रक्तदान
वैभववाडी l प्रतिनिधी : कौस्तुभ माझ्यासाठी हुतात्मा नाही. माझ्यासाठी तो मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणेच आहे. आजही तो कुटुंबासोबत आहे. पण दिसत नाही. जेव्हा जेव्हा माझ्या कुटुंबावर कठीण प्रसंग येतात, तेव्हा मी कौस्तुभ ला साद घालते. कौस्तुभ आम्हाला त्या कठीण प्रसंगातून बाहेर काढतो. असे भावनिक उद्गार वीरमाता ज्योती रावराणे यांनी काढले. तरुणांनी सैन्य दलाकडे वळले पाहिजे. देशाला तुमची गरज आहे. कौस्तुभचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. ध्येयशी एकनिष्ठ रहा. सकारात्मकता टिकवून ठेवा, प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा. असे आवाहनही त्यांनी तरुणांना केले.
मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महारक्तदान शिबिर येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात पार पडले. या रक्तदान शिबिरात एकूण ११८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी विजय रावराणे, सज्जन काका रावराणे, प्राचार्य नामदेव गवळी, प्रमोद रावराणे, सुधीर नकाशे, जयेंद्र रावराणे, संजय रावराणे, गिरीधर रावराणे, राजू पडवळ नागरीक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सेना मेडल कौस्तुभ रावराणे यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल मानवंदना देण्यात आली.
यावेळी ज्योती रावराणे म्हणाल्या, हातात बंदूक घेऊन देशसेवा करण्याचे सदभाग्य प्रत्येकाला प्राप्त होत नाही. पण खचून जाऊ नये. रक्तदान हे देखील एक सेवाच आहे. आपण देशासाठीच रक्तदान करतो.
कौस्तुभनंतर कौस्तुभची पत्नी, माझी सून सैन्य दलात कॅप्टन म्हणून काम करत आहे. माझा नातू देखील आर्मीच्या वातावरणात मोठा होत आहे. आर्मी बद्दल त्याचं देखील चांगलं मत व्हावं म्हणूनच तो आपल्या आई सोबत आहे.
आज बऱ्याच तरुणांना सैन्य दलात जायचे आहे. परंतु त्यांची आई सैन्य दलात जाऊ देत नाही. परंतु महान कार्य करण्यापासून आपण आपल्या मुलाला वंचित ठेवत आहोत. पालकांनी मुलांच्या पाठीशी खंबीर राहिले पाहिजे. मुलांनी देखील क्षमता, कुवत ओळखून काम केले पाहिजे. सैन्य दलाकडे वळले पाहिजे. देशाला तुमची गरज आहे. कौस्तुभचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. वैभवडीतून सैन्य दलात जाणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. वैभववाडी तालुका हा जवानांचा तालुका असा ओळखला गेला पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी संस्था पदाधिकारी सज्जनकाका रावराणे, प्राचार्य नामदेव गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कौस्तुभ रावराणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी कौस्तुभ रावराणे यांना मानवंदना दिली. स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांचे कौस्तुभ ची आई ज्योती रावराणे, मामा व मामी यांनी कौतुक केले.
शासकीय रक्तपेढी व ओरोस व एसएसपीएम रक्तपेढी पडवे चे प्रतिनिधी उपस्थित होते.












