प्रशासनाच्या चालढकल धोरणाबद्दल केला तीव्र शब्दात संताप व्यक्त
लांजा (प्रतिनिधी) : कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी लांजा कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने छेडण्यात आलेले उपोषण आज शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी सुरूच असून प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे ठोस लेखी उत्तर मिळत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. तिसऱ्या दिवशीही तहसीलदार उपोषण स्थळी न आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गुरूवार नंतर शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी उपोषण सुरु असताना लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांनी उपोषणकर्त्या ग्रामस्तांची भेट घेण्याचे सौजन्य दाखवले नाही. त्यामुळे ग्रामस्थानी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र सायंकाळी लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी ग्रामस्थांची भेट घेतली होती. मात्र ग्रामस्थांनी डम्पिंग ग्राउंड रद्द करण्याबाबत केलेल्या मागणीबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारे ठोस उत्तर न दिल्याने कोत्रेवाडी ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले नाही.
तत्पूर्वी सकाळ सत्रात ग्रामस्थांनी उपोषण गाजवले. माकडा माकडा हुप हुप, ओसाड जमिनीतलं खाल्लस तूप, अधिकारी बसलेत खुर्चीवर जनता रडते रस्त्यावर, माजी नगराध्यक्ष मनोहर बाईत याचा अधिकार असो अशा विविध घोषणा देत स्वातंत्र्य दिनी कोत्रेवाडी ग्रामस्थांनी लांजा तहसील परिसर दणाणून सोडला.
तर सलग तिसऱ्या दिवशी आज शनिवारी ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आहेत.
जोपर्यंत प्रशासन आम्हाला डम्पिंग ग्राउंड रद्द होण्याबाबत किंवा स्थगिती मिळण्याबाबत कोणतेही प्रकारचे ठोस लेखी उत्तर देत नाही तोपर्यंत या विरोधातील आपले उपोषण आणि संघर्षाचा लढा हा कायम असाच चालू ठेवण्याचा निर्धार कोत्रेवाडी ग्रामस्थांनी केला आहे.













