रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि भारतीय हवामान विभागाच्या संयुक्त विद्यमाने हवामानावर आधारित कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामानाचा अंदाज
२९ ऑगस्ट: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
३०, ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर: या काळात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
२ सप्टेंबर: काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याव्यतिरिक्त, २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत कोकण विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ५ ते ११ सप्टेंबर दरम्यान पर्जन्यमान सरासरीएवढे राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस हवामान ढगाळ राहील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पिकांसाठी कृषी सल्ला
भात
* शेतात साचलेले अतिरिक्त पाणी काढून टाकावे आणि बांधांची डागडुजी करावी.
* फुटवे अवस्थेतील भात खाचरात ५ सें.मी. पर्यंत पाण्याची पातळी नियंत्रित ठेवावी.
* निळे भुंगेरे, सुरळीतील अळी आणि पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने पिकाचे नियमित निरीक्षण करावे.
* किडींच्या व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% प्रवाही ५ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी.
* तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास अॅसिफेट ७५% पाण्यात विरघळणारी भुकटी २२.५ ग्रॅम किंवा फिप्रोनिल ५% प्रवाही २० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. फवारणी करताना कीटकनाशकाचा फवारा चुडाच्या बुंध्यावर पडेल याची काळजी घ्यावी.
नागली
* जर युरियाची दुसरी मात्रा द्यायची राहिली असेल, तर ती पूर्ण करावी.
* काही ठिकाणी गोगलगायचा प्रादुर्भाव दिसल्यास त्या वेचून युरियाच्या द्रावणात बुडवून नष्ट कराव्यात.
आंबा आणि काजू
* नवीन लागवड केलेल्या झाडांच्या बुंध्याजवळ पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
* जोरदार वाऱ्यामुळे रोपांना आधार द्यावा.
* आंब्याला नियमित फळधारणेसाठी १५ जुलै ते ३१ ऑगस्ट दरम्यान पॅक्लोब्युट्रॉझॉल द्यावे. हे करताना झाडाचा व्यास मोजून त्यानुसार योग्य मात्रा ३ ते ६ लिटर पाण्यात मिसळून बुंध्याभोवती टाकावी. पॅक्लोब्युट्रॉझॉल देण्यासाठी पावसाची उघडीप पाहणे महत्त्वाचे आहे.
* काजूच्या झाडांवर फांदेमर रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास कॉपर ऑक्सीक्लोराइड ०.३% (३० ग्रॅम/१० ली पाणी) किंवा ०.१% बोर्डो मिश्रणाची फवारणी पावसाची उघडीप पाहून करावी.
नारळ
* बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.
* कोंब कुजणे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कुजलेला कोंब साफ करून त्यात १% बोर्डो मिश्रण ओतावे किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फवारणी करावी.
इतर पिके आणि पशुपालन
* सुपारीच्या बागेतील अतिरिक्त पाणी काढून टाकावे.
* ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुपारीला खताचा पहिला हप्ता द्यावा.
* हळद आणि वेलवर्गीय भाजीपाला पिकांमधून साचलेले अतिरिक्त पाणी काढून टाकावे.
* रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या फवारणीची कामे पावसाची उघडीप पाहून करावीत.
* जनावरांना सुरक्षित ठिकाणी, गोठ्यामध्ये बांधावे.
टीप: अधिक माहितीसाठी, जवळच्या कृषी विद्यापीठाचे केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा..












