माध्यमिक विद्यामंदिर साळशी या प्रशालेस माजी विद्यार्थ्यांकडून इलेक्ट्रिक वॉटर फिल्टर प्रदान

सन २००३ च्या एस.एस.सी. बॅचचा शाळेसाठी उपयुक्त उपक्रम

शिरगाव (प्रतिनिधी) – माध्यमिक विद्यामंदिर साळशी प्रशालेच्या एस.एस.सी. मार्च २००३ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उदात्त हेतूने, तसेच शाळेप्रती आपले ऋण व्यक्त करण्याच्या प्रांजळ भावनेतून सुमारे दहा हजार पाचशे रुपये किंमतीचा इलेक्ट्रिक वॉटर फिल्टर भेट स्वरूपात प्रशालेस प्रदान केला.

हा वॉटर फिल्टर एका छोटेखानी कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री. माणिक वंजारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी माजी विद्यार्थी निलेश लाड व रेश्मा मिराशी (धुळप) यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “शाळेप्रती आमचे ऋण थोड्याफार प्रमाणात फेडण्याचा प्रयत्न करीत आहोत. पुढेही शाळेसाठी जे शक्य होईल ते नक्की करण्याचा आमचा निर्धार आहे.”

यावेळी मुख्याध्यापक श्री. माणिक वंजारे यांनी कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या दातृत्वाचे कौतुक केले. “अशा छोट्या छोट्या कामांतून मुलांनी दाखवलेले दातृत्व खरोखरच महान आहे,” असे त्यांनी मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीस याच बॅचचे माजी विद्यार्थी व तत्कालीन चाफेड सरपंच कै. श्री. किरण मेस्त्री यांच्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमास माजी विद्यार्थी निलेश लाड, रेश्मा मिराशी (धुळप), उमेश रावले, उमेश नाईक, कृष्णा सावंत तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शेवटी आभारप्रदर्शन व खाऊवाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल भरणकर सर यांनी केले.