पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून ३० लाखांचा निधी मंजूर
देवरूख (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील वाणीवाडीला स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर पूल (साकव) नसल्याने होणारी अडचण अखेर दूर झाली आहे. ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या या समस्येची दखल घेत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी पुलाच्या बांधकामासाठी ३० लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला आहे.
कडवई वाणीवाडी, बाजारपेठ तसेच समर्थनगर या भागातील लोकांना अंत्यविधीसाठी कडवई तुरळ मार्गाच्या लगत नदीच्यापलीकडे एक स्मशानभूमी आहे. गेली सत्तर वर्षांपासून येथील ग्रामस्थ या पारंपरिक स्मशानभूमीत अंत्यविधी करत आहेत. मात्र या स्मशानभूमी कडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने फार मोठी अडचण होत आहे. पावसाळ्यामध्ये तर मोठ्या पाण्यातून कसरत करत शव न्यावे लागत होते. अनेकवेळा मुसळधार पाऊस असताना येथील तरुण मानवी साखळी करून प्रेत नेत असत. याबाबत बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.
याची गंभीर दखल पालकमंत्री डॉ. सामंत यांनी घेतली आहे. आमदार शेखर निकम यांनी या पुलासाठी 30 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. पालकमंत्री डॉ. सामंत यांनी मागणीला तात्काळ प्रतिसाद देत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत हा निधी मंजूर केला. तसेच, पुढील प्रशासकीय प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यासाठी हा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या निधीमुळे आता स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार होणार असून, वाणी वाडीतील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.










