रत्नागिरीतील चार नगर परिषदा व तीन नगर पंचायतींची अंतिम प्रभाग रचना जाहिर

आता प्रतिक्षा नगरसेवक व नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीची

नरेंद्र मोहिते | राजापूर 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या अंतिम प्रभाग रचनेनंतर आता जिल्हयातील मुदत संपून निवडणूकीसाठी पात्र असलेल्या रत्नागिरी, राजापूर, चिपळूण व खेड या चार नगर परिषदा व गुहागर, देवरूख व लांजा या तिन नगर पंचायती यांची अंतिम प्रभाग रचना मंगळवारी जाहिर झाली आहे. त्यामुळे आता नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीनंतर या चार नगर परिषदा व तीन नगर पंचायतींमध्ये निवडणूकीचा धुरळा उडणार आहे.

शासनाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याच्या प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ देताना ३१ जानेवारी २०२६ पुर्वी निवडणूक प्रक्रिया पुर्ण करा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे शासनाला आता ३१ जानेवारी पुर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती, महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायती यांच्या निवडणूकीची प्रक्रिया पुर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे आता रत्नागिरीकरांनाही जिल्हयातील जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समिती, रत्नागिरी, राजापूर, चिपळूण व खेड या चार नगर परिषदा व पंचवार्षिक मुदत संपलेल्या तीन नगर पंचायती यांच्या निवडणूकीचे वेध लागले आहेत. प्रशासनाकडून प्रभाग रचना, आरक्षण, मतदार याद्या अद्ययावतीकरण यांसह निवणूकीची प्रक्रिया सुरू झाल्याने निवडणूकीचे पडघम आत्तापासूनच वाजायला लागले आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीनंतर आता नऊ तालुका पंचायत समीत्यांच्या पंचायत समितींच्या सभापती पदाची आरक्षण सोडत मंगळवारी झाली. यामध्ये दापोली नागरिकांचा मागासवर्ग ; राजापूर नागरिकांचा मागासवर्ग महिला, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी सर्वसाधारण; मंडणगड, संगमेश्वर, लांजा, खेड सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे.

रत्नागिरी जिल्हयात मुदत संपून प्रशासकिय राजवट असलेल्या जिल्हा परिषदेसह रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली व मंडणगड या सर्व तालुका पंचायत समितींच्या निवडणूका होणार आहेत. तर जिल्हयातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण व खेड या चार प्रमुख नगर परिषदांच्याही निवडणूका होणार आहेत. तर जिल्हयातील गुहागर, देवरूख व लांजा या तिन नगर पंचायतींमध्येही निवडणूकीचा धुरळा उडणार आहे.

जिल्हयातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण व खेड या चार प्रमुख नगर परिषदा तर गुहागर, देवरूख व लांजा या तिन नगर पंचायती या ठिकाणीही निवडणूका होणार आहे. यासाठी मंगळवारी अंतिम प्रभार रचना प्रशासनाकडून जाहिर करण्यात आली आहे. आता प्रभागांतील नगर सेवक पदांच्या आरक्षण व नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यासाठीची आरक्षण सोडत झाल्यानंतर या चार नगर परिषदा व तीन नगर पंचायतींमध्ये निवडणूकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.