दोडामार्ग l प्रतिनिधी :हिंदुरक्षा महासमितीच्या वतीने हिंदूंवरील वाढते अत्याचार आणि दोडामार्ग तालुक्यातून होणारी गोमांस वाहतूक पूर्णपणे थांबवण्याच्या मागणीसाठी, तसेच हिंदुत्वासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ, दोडामार्ग शहरात शनिवारी, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता ‘महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत दोडामार्गवासीय आणि जिल्ह्यातील इतर संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदुरक्षा महासमितीने केले आहे.
पत्रकार परिषदेतून रॅलीची माहिती
हिंदुरक्षा महासमितीचे कार्यकर्ते गणेश गावडे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी रॅलीच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. गावडे म्हणाले की, दोडामार्ग तालुक्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेचे काही कार्यकर्ते गेली सोळा दिवस तुरुंगवास भोगत आहेत. आतापर्यंत इथल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना जे सहकार्य केले, ते राज्यात कुठेही दिसून येत नाही. या कार्यकर्त्यांनी यापूर्वीही भूजीहाद, लव्हजिहाद, थुंक जिहाद, गोमांस तस्करी आणि धर्मांतरण यांसारख्या प्रकरणांची माहिती वेळोवेळी पोलिसांना दिली होती आणि त्यांना मदतही केली होती.
गावडे यांनी प्रश्न उपस्थित केला की, असे काय घडले की, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर भयंकर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची वेळ पोलिसांवर आली? याचा संपूर्ण तपास करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोमांस तस्करी आणि कार्यकर्त्यांवरील गुन्हे
कर्नाटक राज्यातून दोडामार्ग मार्गे गोमांसची तस्करी होत असेल, तर याची खबरदारी घेणे हे प्रशासनाचे आणि पोलीस यंत्रणेचे काम आहे. तरीही तालुक्यातून अनेक वेळा गोमांस तस्करी होत असल्याचे दिसत आहे.
“आमच्या कार्यकर्त्यांवर झालेले हे आरोप आणि गुन्हे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. ज्या सोळा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतले, त्यांचा आम्हांला सार्थ अभिमान वाटतो,” असे गावडे यांनी यावेळी नमूद केले. देशात जर काही चुकीचे घडत असेल आणि त्याबाबत पोलिसांना सूचना देऊनही ते थांबत नसेल, तर यापुढे रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी तमाम हिंदू बांधवांची राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांकडे प्रकरणांची यादी सादर करणार
हिंदू रक्षा समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांना भेटून हिंदू धर्मविरोधात चाललेल्या सर्व प्रकरणांची यादी त्यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. “हिंदू राष्ट्राकडे जर कोणी खेळ करत असेल, तर ते आम्ही कदापिही सहन करणार नाही,” असा ठाम निर्धार गावडे यांनी व्यक्त केला.
हिंदू एकतेची ताकद दाखवण्याचे आवाहन
या ‘हिंदू एकता रॅली’मध्ये हिंदू धर्माशी निगडीत असलेल्या सर्व संघटना, सामाजिक संस्था, संप्रदाय, मंदिर समित्या, कला-क्रीडा-सांस्कृतिक मंडळे, युवाशक्ती, मातृशक्ती आदी सर्व हिंदू बांधवांनी सहभागी होऊन हिंदू एकतेची ताकद दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही रॅली राष्ट्रवळी मंदिर (सावंतवाडा) ते दोडामार्ग मुख्य चौक अशी जाणार आहे











