माखजन येथे १५ रोजी राज्यस्तरीय निसर्ग चित्र स्पर्धा

 माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन इंग्लिश स्कूल माखजन येथे,श्री अशोकजी पोंक्षे कलादालन आयोजित राज्यस्तरीय निसर्गचित्र स्पर्धा होणार आहेत.ही स्पर्धा १५ नोव्हेंबर रोजी होईल.तर १२ नोव्हेंबर रोजी माखजन दशक्रोशीतील प्राथमिक,माध्यमिक शाळांच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा होणार आहे.
१२ रोजी होणारी दशक्रोशिस्तरीय चित्रकला स्पर्धा ३ गटात होईल.३ री,४ थी पाहिला गट,५ वी ते ७ वी दुसरा गट,तर ८ वी ते १० वी तिसरा गट असेल.प्रत्येक गटातून प्रथम,द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ असे क्रमांक काढले जाणार असून प्रत्येकी भेटवस्तू,सन्मानचिन्ह,व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.ही स्पर्धा प्रशालेत १२ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे.
तर १५ रोजी राज्यस्तरीय निसर्गचित्र कला स्पर्धा होणार आहे.यामध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ असे क्रमांक काढण्यात येतील.ही स्पर्धा खुली असून आगाऊ नाव नोंदणी करावी लागणार आहे.प्रथम येणाऱ्यास रोख १२ हजार,द्वितीयस १० हजार,तृतीयस ८ हजार,उत्तेजनार्थ ला ६ हजार व प्रत्येकी सन्मानचिन्ह,व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.निसर्गचित्र रेखाटण्यासाठी विशेषतः आंबव पोंक्षे व बुरंबाड असे गाव निवडण्यात आले आहेत.
दोन्ही स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा १५ रोजी दुपारी ३ वाजता संस्था अध्यक्ष किशोर साठे यांच्या अध्यक्षतेखाली व सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ रंगकर्मी,आंबव पोंक्षे येथील श्री सूर्यनारायण संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक श्री अशोक पोंक्षे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
दोन वर्षांपूर्वी श्री अशोक पोंक्षे यांच्या भरीव देणगीतून माखजन इंग्लिश स्कूल माखजन मध्ये कलादालनाची निर्मिती झाली.यानंतर या कलादालनाच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.यावर्षी याची व्याप्ती वाढवत राज्य स्तरीय निसर्ग चित्र स्पर्धा भरवण्यात आली आहे.यासाठी श्री अशोक पोंक्षे यांचे विशेष सहाय्य लाभत आहे.
या दोन्ही स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन मा.पं.शि. प्र.मंडळाचे अध्यक्ष किशोर साठे व मुख्याध्यापक महादेव परब यांनी केले आहे.या स्पर्धेविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अमोल पाटील (९५७९०४२६५२) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.