खेड (प्रतिनिधी) –
खेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने सपना ऋषिकेश कानडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना ऋषिकेश कानडे, सहदेव बेटकर, दत्ता शेठ भिलारे, गौस खतीब, शंकर कांगणे आणि नागेश तोडकरी यांसह आघाडीतील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सपना ऋषिकेश कानडे या खेड शहरातील एक उद्योजिका असून त्या मनसेचे खेड शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांच्या पत्नी आहेत. महाविकास आघाडीने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास यंदाच्या निवडणुकीत विशेष लक्षवेधी ठरत आहे. महाविकास आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि नॅशनल काँग्रेस पार्टी या पक्षांचा समावेश आहे. या चारही पक्षांच्या संयुक्त नेतृत्वाखाली खेड नगरपालिका निवडणुकीसाठी आघाडीने मोठी तयारी केली आहे. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकूण 25 उमेदवार सदस्यपदासाठी रिंगणात उतरवले आहेत. यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे 13, राष्ट्रवादी काँग्रेसचे 6, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे 2 आणि काँग्रेसचे 4 उमेदवारांचा समावेश आहे.
दहा प्रभागांमध्ये होणाऱ्या 20 जागांसाठी या 25 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळते. खेड नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने उभारलेली भक्कम उमेदवारांची फळी आणि सपना ऋषिकेश कानडे यांच्या उमेदवारीमुळे आगामी निवडणुकीची लढत अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.













