महावितरण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोकण परिमंडळाची कौतुकास्पद कामगिरी.

रत्नागिरी / सिंधुदुर्ग  : महावितरण आपल्या कर्मचाऱ्यांतील खेळ गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करीत असते. महावितरणच्या अनेक महिला व पुरुष खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांमध्ये त्यांच्या यशोगाथा रंगवल्या आहेत. म्हणून महावितरणमध्ये दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन खूप थाटत होते. महावितरणच्या 16 परिमंडळातील खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेतात. यावर्षी सुद्धा अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले होते. या राज्यस्तरीय स्पर्धेत कल्याण व रत्नागिरी परिमंडळाने एक टीम म्हणून सहभाग घेतला होता. या चार दिवसांच्या खेळ स्पर्धेत महावितरण कोकण परिमंडळातील खेळाडूंनी खूप चांगले प्रदर्शन करून एकूण ०१ सुवर्ण व ०४ रोप्य पदक जिंकले असून रत्नागिरी परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

सिंधुदुर्गातील खेळाडूचे उल्लेखनीय यश
शरीरसौष्ठव 70 किलो गट : महावितरण सिंधुदुर्गातील गोपाळ कुलकर्णी यांनी अप्रतिम प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावत कोकणाचे नाव उज्ज्वल केले.

रत्नागिरीतील खेळाडूंची दमदार कामगिरी
शरीरसौष्ठव – ७५ किलो गट : राजेंद्र जाधव – रौप्य पदक, शरीरसौष्ठव – ९० किलो गट : अपूर्व शिर्के – रौप्य पदक, भाला फेक (पुरुष) : मिलिंद डाफळे – रौप्य पदक, कुस्ती – ७० किलो गट : सरदार हराळे – रौप्य पदक

कोकण परिमंडळातील खेळाडूंनी महावितरण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सादर केलेली ही उल्लेखनीय कामगिरी परिमंडळासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई करून रत्नागिरी व सिंधुदुर्गातील खेळाडूंनी आपल्या क्रीडा कौशल्याचा भक्कम ठसा उमटवला. या यशामुळे कोकण परिमंडळाचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून आगामी क्रीडा स्पर्धांमध्ये अजून मोठी झेप घेण्यासाठी हे यश निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.असे प्रतिपादन रत्नागिरी परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी केले. तसेच खेळाडू, प्रशिक्षक आणि संबंधित सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.