अपक्ष उमेदवार स्मिता लाड यांच्या उमेदवारीमुळे मात्र येणार आणखीनच रंगत
नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार पंचरंगी
निलेश जाधव / देवरूख :
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असल्यामुळे ही निवडणूक पंचरंगी होणार आहे. मात्र असे असले तरी महायुती व महाविकास आघाडीमध्येच नगराध्यक्षपदासाठी थेट लढत होणार आहे. दरम्यान, अपक्ष उमेदवार स्मिता लाड यांच्या उमेदवारीमुळे या निवडणूकीत आणखीनच रंगत येणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून दंड थोपटलेल्या श्रेया संतोष केदारी यांची समजूत काढण्यात वरीष्ठांना यश आल्याने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या मृणाल शेट्ये यांचा मार्ग सुकर झाला आहे.
देवरूख नगरपंचायतीची निवडणूक ही राजकीय पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची समजली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष ताकदीनिशी उतरले आहेत. या निवडणूकीसाठी महायुती म्हणून भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महाविकास आघाडी म्हणून शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस व वंचित आघाडी असे पक्ष महायुती व महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर आप व गावविकास समिती हे एकत्र निवडणूक लढत अहेत. तसेच अपक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी आता एकूण पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे एका जागेसाठी पाच उमेदवार निवडणुक रिंगणात उभे असल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून भाजपच्या सौ. मृणाल शेट्ये, महाविकास आघाडीकडून उबाठाच्या सौ. सबुरी थरवळ, आपकडून सौ. दिक्षा खंडागळे, अपक्ष स्मिता लाड व अपक्ष वेदीका मोरे असे एकूण ५ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी निवडणुक रिंगणात आहेत.
यातील भाजपच्या मृणाल शेट्ये यांनी पाच वर्षे नगराध्यक्षा म्हणून अतिशय चांगल्याप्रकारे कारभार केला आहे. यात त्यांच्या कार्यकाळात अग्नीशमन गाडी देवरूख शहरासाठी उपलब्ध झाली आहे. यासाठी नगराध्यक्षा म्हणून त्यांनी सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळून देवरूखला स्वतंत्र अग्नीशमन गाडी मिळाली आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शहरातील अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. अतिशय पारदर्शी कारभार त्यांनी केला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा त्यांना भाजपने महायुतीकडून उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून उबाठाच्या सबुरी थरवळ पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आहेत. त्या पहिल्यांदाच या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या या निवडणुकीत कडवे आव्हान देण्याची शक्यता आहे.
अपक्ष म्हणून स्मिता लाड या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. यापूर्वीही त्यांनी तेव्हाच्या एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी निवडणुक लढवली होती. यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्या पं. स. च्या माजी सभापती राहिल्या आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर एक कडवे आव्हान उभे राहू शकते. असे बोलले जात आहे. तसेच त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत आणखीनच रंगत येवू शकते. आपकडून दिक्षा खंडागळे या पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. तर अपक्ष म्हणून तरूण असणाऱ्या कु. वेदीका मोरे याही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरल्या आहेत. विशेष म्हणजे त्या सध्या लाँच्या चौथ्या वर्षात शिकत आहेत. एक तरूण चेहरा म्हणून त्यांनी निवडणुकीत उतरून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. एकंदरीत या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकूण पाच उमेदवार निवडणुक रिंगणात उभे असल्यामुळे ही निवडणुक आणखीनच रंगतदार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.












