मतदान सुरळीत पार पडण्यासाठी २ डिसेंबर रोजी सिंधुदुर्गातील आठवडी बाजार बंद 

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आदेश

सिंधुदुर्ग : मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या संदर्भीय पत्र क्र. ०१अन्वये नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झाला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत, मालवण नगरपरिषद, सावंतवाडी नगरपरिषद आणि वेंगुर्ला नगरपरिषद या ठिकाणी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.

 

मतदान सुरळीत व शांततेत पार पडावे, मतदारांना मतदानाचा हक्क निर्विघ्नपणे बजावता यावा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने २ डिसेंबर २०२५ रोजी जिल्ह्यात भरविले जाणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जारी केले आहेत.

 

कणकवली, मालवण, सावंतवाडी व वेंगुर्ला या नगरपालिका क्षेत्रांत मतदानाच्या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार बंद राहणार असून, संबंधित बाजार इतर दिवशी भरविण्यास प्रशासनाने अनुमती दिली आहे.

 

मतदान प्रक्रियेला कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने हे आदेश लागू केले आहेत.