प्रशासन वरमले, जागेच्या पुर्ततेसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन
लांजा (प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ येथे विनंती बस थांबा (प्रवासी निवारा शेड) बांधण्यात न आल्याने होणाऱ्या गैरसोयी संदर्भात वेरळ येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत
महामार्गाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले .याशिवाय अन्य मागण्याची पूर्तता न झाल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे .
मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. वेरळ येथील बस थांब्याजवळ महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने कमी जागा अधिग्रहण करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी प्रवासी निवारा शेड बांधण्यात आलेली नाही. याशिवाय वेरळ बस थांब्याजवळ महामार्गाची बंदिस्ते गटारे, सर्विस रोड यासाठी सुद्धा संबंधित बांधकाम विभागाने जागेची तरतूद केलेली नसल्याने येथील ग्रामस्थ, नोकरदार ,विद्यार्थी यांना महामार्गावर
उन्हातान्हात उभे राहून गाड्यांची वाट पाहावी लागत आहे .
या पार्श्वभूमीवर अखेर वेरळ ग्रामस्थांच्या वतीने बांधकाम विभागाचे (महामार्ग ) उप अभियंता श्री कुलकर्णी यांना पाचारण करून याबाबत जाब विचारण्यात आला. चौपदरीकरण झाल्याने आता प्रवाशांना जो मनस्ताप होत आहे त्यावर उपाययोजना काय करनार ? प्रवासी निवारा शेड नसल्याने होणाऱ्या गैरसोयी बाबत आपण काय उपाय योजना करणार?
याचा जाब विचारण्यात आला.
दरम्यान, ग्रामस्थांची रास्त मागणी लक्षात घेऊन बस थांब्यासाठी आपण भूमी अभिलेख कार्यालयाकडे जागा मोजून घेण्यासाठी पत्रव्यवहार करणार असल्याचे श्री कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही महामार्ग रोखू असा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी सरपंच सुवर्णा जाधव ,दिपाली साळवी, शरद चरकरी, प्रभाकर चव्हाण, सुधाकर लांजेकर, स्मिता खामकर,मंगेश डाकवे ,दिनेश पातेरे,महेश गुंड्ये आदींसह सुमारे २०० ग्रामस्थ उपस्थित होते.












