रोटरी स्कूलमध्ये भारतीय सांस्कृतिक वारशाचे जतन; ‘विविधतेत एकता’ उपक्रमाचे भव्य आयोजन

खेड (प्रतिनिधी) : दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेड येथे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण व्हावी आणि तिचे जतन व्हावे या उद्देशाने “भारतीय सांस्कृतिक वारसा” या विषयावर अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यांचे पारंपरिक पोशाख परिधान करून “विविधतेत एकता” ही संकल्पना प्रभावीपणे साकारली. कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, काश्मीर, केरळ, बंगाल, आसाम आदी राज्यांची संस्कृती दर्शविणारे पारंपरिक वेश, दागिने आणि वेशभूषा विद्यार्थ्यांनी सादर केल्या. लोकनृत्य, पारंपरिक चाल-ढाल आणि सांस्कृतिक प्रतीकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भारताच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या देशाच्या सांस्कृतिक वारशाबद्दल जिव्हाळा निर्माण झाला असून तो जतन करण्याची भावना अधिक दृढ झाली आहे. समाजशास्त्र विषयाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले. शाळा प्रशासनानेही अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळते आणि राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव बळकट होते, असे मत व्यक्त केले.
रोटरी शाळेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरते शिक्षण न देता भारतीय संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव देणारा ठरला. त्यामुळे पालक, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांकडून कार्यक्रमाचे भरभरून कौतुक करण्यात आले.
संस्थेचे चेअरमन मा. श्री. बिपीनदादा पाटणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. एकूणच हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून भारतीय संस्कृतीचे मोल त्यांच्या मनात रुजवणारा ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.