राजापूर पत्रकार संघाचे सन २०२६ चे पुरस्कार जाहीर

पत्रकार दिनी ६ जानेवारी रोजी होणार पुरस्कार वितरण
राजापूर (वार्ताहर): राजापूर पत्रकार संघाच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली असून यावर्षी आदर्श संस्था पुरस्कारासाठी ग्रामिण समाज प्रबोधिनी येळवण या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
तर आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्कार गेली अनेक दशके वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. पी. एस. बावकर यांना, कृषी विषयक पुरस्कारासाठी पंचगव्य आणि गोधन संरक्षण कामासाठी सोलगांव येथील सौ. सई सुहास पंडीत यांना तर आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जि. प. विश्वनाथ विद्यालय राजापूर नं. १ च्या मुख्याध्यापिका श्रीमती अक्षता रहाटे यांची निवड करण्यात आली आहे.
६ जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून राजापूर पत्रकार संघाचे वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. या जोडीने राजापूर तालुक्यात शिक्षण, आरोग्य शेती आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर पुरस्कार विजेत्यांची नावे घोषीत करण्यात आली आहेत.
त्यामध्ये ग्रामिण भागामध्ये राजापूर व संगमेश्वर  तालुक्यात  मुलांना माध्यमिक शिक्षणाची सुविधा निर्माण करणारे चंदुभाई देशपांडे यांची ग्रामिण समाज प्रबोधिनी येळवण संस्था आदर्श संस्था पुरस्काराचे मानकरी ठरली आहे.
तर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असताना श्रीमती अक्षता रहाटे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. शिक्षणासोबतच विविध उपक्रम राबवून ते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत आहेत. त्याद्वारे खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडविण्याच्या त्यांच्या कामाची दखल घेवून त्यांना यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करण्यात येत असून पत्रकार दिन आणि विशेष पुरस्कार वितरण समारंभाला सर्वांनी मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राजापूर पत्रकार संघ, राजापूरतर्फे करण्यात आले आहे.