खेड (प्रतिनिधी):
तालुक्यातील मौजे वेरळ येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने १ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्री. केतन वसंत मोरे (वय ४९, रा. दादर मुंबई व मूळ रा. वेरळ, ता. खेड) यांचे वेरळ येथील घर बंद असताना ही चोरी झाली. दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:०० ते २७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कोणत्यातरी हत्याराने तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने बेडरूममधील कपाटात ठेवलेली १ लाख रुपयांची रोकड (५०० रुपयांच्या २०० नोटा), १ हजार रुपये किमतीची दोन चांदीची नाणी आणि १ हजार रुपये किमतीचा गणपती-लक्ष्मीचा फोटो असलेला आयताकृती बॉक्स, असा एकूण १ लाख २ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या घटनेबाबत फिर्यादी यांनी दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा तक्रार दिली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.













