वाशिष्ठी कृषी महोत्सवात ५ ते ९ जानेवारीपर्यंत इतिहास, भक्ती, संगीताची हृदयस्पर्शी अनुभूती
दररोजची सायंकाळ ठरणार अविस्मरणीय; भावनांचा अनोखा सोहळा
चिपळूण : सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या आणि संपूर्ण कोकणात नावाजल्या जाणाऱ्या चिपळूणमधील वाशिष्ठी कृषी महोत्सवात यंदाही नवचैतन्य, नवी ऊर्जा आणि अस्सल मराठी संस्कृतीचा सुगंध दरवळणार आहे. या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांना केवळ कार्यक्रम पाहण्याचा नाही, तर इतिहास जगण्याचा, भक्ती अनुभवण्याचा आणि सुरांमध्ये चिंब होण्याचा अनोखा अनुभव मिळणार आहे. ५ ते ९ जानेवारी या कालावधीत संगीत, भक्ती, शौर्य, निष्ठा आणि मनोरंजन यांचा हृदयाला भिडणारा संगम रसिकांना दररोज रात्री अनुभवता येणार आहे.
वाशिष्ठी डेअरीच्या वतीने आयोजित वाशिष्ठी कृषी महोत्सव यंदा अधिक भव्य, अधिक भावस्पर्शी आणि अधिक प्रेरणादायी स्वरूपात साजरा होणार आहे. महोत्सवाच्या मंचावर दररोज सादर होणारे कार्यक्रम केवळ करमणूक करणारे नसून, मनाला स्पर्श करणारे, संस्कृतीची मुळे घट्ट करणारे आणि नव्या पिढीत स्फूर्ती निर्माण करणारे ठरणार आहेत.
५ जानेवारी – सायं. ५ वा.
महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी, दि. ५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता विघ्नहर्ता ढोलपथक, मुकुंद गुरव तुतारी वादक आणि छत्रपती शिवाजी पेठ कोल्हापूर येथील गणेश कदम यांचा पारंपारिक वाद्यांचा गजर, तुतारीचा नाद आणि मर्दानी खेळांची रोमांचक अनुभूती देणारा ‘पारंपारिक वाद्य व स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा’ हा एकत्रित कार्यक्रम रंगणार आहे. ढोलपथकाचा निनाद, तलवारबाजी, दाणपट्टा आणि भाल्याच्या खेळातून स्वराज्याचे महत्त्व, मावळ्यांचे शौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणादायी कथा अंगावर शहारे आणणाऱ्या स्वरूपात सादर होणार, यात शंकाच नाही.
६ जानेवारी – रात्री ८ वा.
दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जनावरांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होईल. तर सायंकाळी ६ वाजता हरिपाठ रंगणार आहे. तसेच, रात्री ८ वाजता कृष्णाई इव्हेंट प्रस्तुत ‘वारी’ हा भक्तिरसाने ओथंबलेला कार्यक्रम रसिकांच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित करणार आहे. संतांच्या विचारांचा जागर, विठ्ठल नामाचा जयघोष, भक्ती आणि संस्कृतीचा महासंगम अनुभवण्याची ही संधी वाशिष्ठी कृषी महोत्सवाला एक वेगळे आध्यात्मिक परिमाण देणारी ठरणार आहे.
७ जानेवारी – रात्री ८ वा.
दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मांजरप्रेमींसाठी आकर्षण ठरलेल्या कॅट शोचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी ६ वाजता कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तसेच, रात्री ८ वा. कृष्णाई इव्हेंट प्रस्तुत ‘मावळा – स्वराज्याचे शिलेदार’ या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या मावळ्यांच्या बलिदानाची, निष्ठेची आणि शौर्याची गाथा नव्या पिढीसमोर जिवंत केली जाणार आहे. इतिहास केवळ पुस्तकात न राहता, तो अनुभवता यावा, अशी ही सशक्त मांडणी रसिकांच्या मनात अभिमानाची ज्योत पेटवणारी ठरणार आहे.
८ जानेवारी – रात्री ८ वा.
दि. ८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता श्वानप्रेमींना सुवर्णसंधी प्राप्त करून देणारा डॉग शो होणार असून सायंकाळी ६ वाजता भजनात तल्लीन होण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. तसेच रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते यांच्या बहारदार सुरांनी महोत्सवाचा परिसर दुमदुमून जाणार आहे. हिट गाण्यांच्या तालावर रसिकांना मनमुराद आनंद लुटण्याची सुवर्णसंधी या लाईव्ह शोमधून मिळणार आहे.
९ जानेवारी – रात्री ८ वा.
महोत्सवाचा समारोप दि. ९ जानेवारी रोजी रात्री आठ वाजता, प्रसिद्ध संगीतकार अशोक हांडे यांच्या ‘आवारा हूँ’ या लाईव्ह शोद्वारे होणार आहे. राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या संगीतमय जीवनगाथेचे हृदयस्पर्शी सादरीकरण निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक अशोक हांडे यांच्या सर्जनशील मांडणीतून रसिकांना अनुभवता येणार आहे.
वाशिष्ठी कृषी महोत्सवाचे हे सलग तिसरे वर्ष असून, कृषी प्रदर्शन, विविध स्पर्धा, तंत्रज्ञानाची माहिती, खाद्यपदार्थांची रेलचेल आणि मनोरंजन यांचा संगम असलेला हा महोत्सव संपूर्ण कुटुंबासाठी एक आनंदाची पर्वणी ठरणार आहे. या सर्व कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू असून, जास्तीत जास्त रसिकांनी या अविस्मरणीय सांस्कृतिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन श्री. प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांनी केले आहे.
चिपळूणकरांच्या मनात उत्सुकता जागवणारा, भावनांना स्पर्श करणारा आणि संस्कृतीचा अभिमान वाढवणारा वाशिष्ठी कृषी महोत्सव यंदा नक्कीच दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरणार आहे.











