सवाद्य मिरवणुक काढत केला आनंदोत्सव साजरा
राजापूर (वार्ताहर): राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेस जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट देण्याच्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत घेण्यात आलेल्या सन २०२५-२६ नासा इस्त्रो निवड चाचणी परिक्षेत येथील जि. प. विश्वनाथ विद्यालय राजापूर नं. १ या शाळेतील सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांची बुधवारी राजापूर शहरातून मिरवणुक काढत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यामध्ये ओवी संदीप पवार हिची नासा व इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली. तर शिवसमर्थ प्रशांत मुंढे याची नासा अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली. तसेच ईश्वरी नंदकुमार चव्हाण, स्वरा शशांक भोसले, आराध्य नितीन देसाई, वेद प्रकाश परवडे यांची इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका श्रीमती प्रियंका कोंडे, सौ. दर्शना गवाणकर, सौ. अंकिता बाणे यांनी मार्गदर्शन केले. अभ्यासदौऱ्यासाठी निवड झालेले विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अक्षता रहाटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदिप चव्हाण, दिपक चव्हाण, मनोज सप्रे तसेच सदस्यांनी अभिनंदन केले. शाळेने मिळविलेल्या यशाबद्दल विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, विस्तार अधिकारी सुनिल चव्हाण, केंद्रप्रमुख अनिल जायदे यांनी अभिनंदन केले.
नासा इस्त्रो अभ्यासदौऱ्यासाठी निवड झालेल्या या विद्यार्थ्यांनी बुधवारी विश्वनाथ विद्यालयाच्या शालेय व्यवसथापन समिती आणि शिक्षक पालक समितीच्या वतीने विश्वनाथ विद्यालय ते जवाहरचौक अशी सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. संपूर्ण तालुक्यातून आठ विद्यार्थ्यांची निवड होत असताना तब्बल सहा विद्यार्थी विश्वनाथ विद्यालयातील निवडले गेल्याने पालक व शिक्षकांतून जल्लोष व्यक्त करण्यात आला.
या मिरवणुकीत मुख्याध्यापिका श्रीमती रहाटे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदिप चव्हाण यांसह समितीचे सर्व सदस्य, पालक सौ. व श्री. संदीप पवार, श्री. व सौ. प्रितम देसाई, नंदकुमार चव्हाण, सौ. व श्री. शशांक भोसले, प्रकाश परवडे, शिक्षकवृंदापैकी सौ. रूपाली नलवडे, श्रीमती स्वप्नाली खरात, सौ. दिपाली कातकर, सौ. दर्शना नाधवडेकर, सौ. स्नेहल माने, सौ. आरती पाटील आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते सातवी विद्यार्थ्यांसाठी ही निवड चाचणी परिक्षा घेतली जाते. प्रत्येक तालुक्यातुन विविध टप्यावर परीक्षा घेत आठ विद्यार्थी निवडले जातात. मागील काही वर्षापासून हा उपक्रम सुरू असून यामधुन मुलांमध्ये विज्ञानिक दृष्टीकोन वाढिस लागून नासा व इस्त्रो या अंतराळ संशोधन संस्थेस भेट देण्याची संधी प्राप्त होते.












