खेड तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेला गती पंचायत समितीसाठी ११ तर जिल्हा परिषदेसाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल

खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगात सुरू असून आज विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी खेड यांच्याकडे सादर केले. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने सुकवली गणातून सुनिता बाळकृष्ण कासार, तिसंगी गणातून महेंद्र शांताराम भोसले, खवटी गणातून नम्रता संतोष तांबट, भरणे गणातून प्रशांत पांडुरंग चव्हाण, भडगाव गणातून संग्राम सतीश कदम, दयाळ गणातून शर्मिका सूर्यकांत म्हादे, गुणदे गणातून सुनील बाबाराम मोरे, लोटे गणातून जीवन गोविंद आंब्रे तसेच अंबडस गणातून सीमा रामचंद्र सकपाळ यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय गुणदे गणातून संजय रामचंद्र आखाडे यांनी भारतीय जनता पार्टीकडून तसेच अपक्ष म्हणून असे दोन स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण अकरा उमेदवारी अर्ज दाखल झाले असून दहा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
दरम्यान, दिलेल्या आरक्षण यादीनुसार खेड पंचायत समितीमध्ये एकूण चौदा जागा असून त्यापैकी सात जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी स्वतंत्र आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या वतीने सुकवली जिल्हा परिषद गटातून सचिन विश्राम धाडवे, भरणे गटातून मानसी महेश जगदाळे, भडगाव गटातून रवींद्र पांडुरंग रेवाळे, वीराचीवाडी गटातून रेवती राजेश पाटील तसेच धामणदेवी गटातून जाई राजेंद्र आंब्रे यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी खेड यांच्याकडे दाखल केले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सध्या पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
निवडणूक अर्ज दाखल होण्याच्या प्रक्रियेमुळे खेड तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून येत्या काही दिवसांत अधिक उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.