विजयालक्ष्मी राऊत यांच्या स्मरणार्थ उमाबाई बर्वे ग्रंथालयात जिल्हास्तरीय खुली कथाकथन स्पर्धा

देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्या वतीने कै. सौ. विजयालक्ष्मी राऊत यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय खुली कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात होणार आहे.

 

या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. महाविद्यालयीन तसेच इतर खुल्या गटातील स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धकांनी आपली कथा १० मिनिटांच्या कालावधीत कोणत्याही लिखित साहित्याचा आधार न घेता सादर करायची आहे. कथेचा विषय व सादरीकरण या निकषांवर परीक्षकांकडून गुणदान करण्यात येणार आहे.

 

स्पर्धेत प्रथम क्रमांकास ११११ रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास ७७७ रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकास ५५५ रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच परीक्षकांच्या निर्णयानुसार उत्तेजनार्थ पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

 

स्पर्धकांनी आपली नावनोंदणी दि. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत ग्रंथपाल श्री. प्रशांत बांदकर (मो. ९४२२६०२१६०) यांच्याकडे करावी, असे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. गुरुदेव परुळेकर व सचिव श्री. एस. एस. पाटील यांनी केले आहे.