साईओ रवींद्र खेबूडकर यांचे नागरिकांना आवाहन
मसुरे | झुंजार पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनमार्फत आंगणेवाडी जत्रोत्सवामध्ये प्लास्टिक मुक्तीचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्ह्याला प्लास्टिकमुक्त करण्याच्या मोहिमेचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. आंगणेवाडी श्री भराडी देवी जत्रोत्सव ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. हॉटेल आणि फूड स्टॉल्सना जैविक व प्लास्टिक कचरा वेगळा करण्यासाठी निळ्या व हिरव्या रंगाच्या गार्बेज बॅग दिल्या जातील.
व्यापाऱ्यांकडून ‘स्वच्छता डिपॉझिट’ आकारले जाईल; कचऱ्याचे योग्य नियोजन केल्यास हे डिपॉझिट परत मिळणार आहे. प्रतिबंधित ‘सिंगल युज प्लास्टिक’ आढळल्यास नियमानुसार कडक दंड आणि कारवाई केली जाणार आहे.
ग्रामपंचायतींमार्फत ठिकठिकाणी कंपोस्ट खड्डे तयार करून जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. भाविकांनी सुद्धा सिंगल युज प्लास्टिकचा वापर करण्या ऐवजी कपड्याच्या पिशव्यांचा वापर करावा. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी भाविक, व्यापारी आणि स्थानिकांना या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले असल्याची माहिती मालवण गटविकास अधिकारी शाम चव्हाण, बीळवस ग्रामपंचायत प्रशासक तथा विस्तार अधिकारी सुनील चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी युगलकिशोर प्रभूगावकर यांनी दिली आहे.












