▪️वायंगणी हायस्कुल येथे वार्षिक गुणगौरव कार्यक्रम
मसुरे | झुंजार पेडणेकर :ज्ञानदीप संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे कार्य निरंतर सुरु असून आज ज्ञानदीप विद्यालयाचे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षामध्ये आपली छाप सोडत आहेत. येथे घडलेले माजी विद्यार्थीही विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्ञानदीप संस्थेची ही यशस्वी वाटचाल अशीच सुरु राहिल, सर्वांच्या सहकार्यातून संस्थेची उन्नती साधू असे प्रतिपादन विश्वास ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी केले.
वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय येथे कै. काकासाहेब आसोलकर यांचा स्मृतिदिन, संस्थेचा संकल्पदीन व प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संस्था अध्यक्ष श्री हनुमंत प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, कृषी विस्तार अधिकारी व्ही. के. जाधव, पोलीस पाटील श्री. बेनाडे, शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत हडकर, मुख्याध्यापक जे.डी.टकले, संचालक सुरेश सावंत ,बाळु वस्त, मनोहर वायंगणकर, माजी मुख्याध्यापक प्रकाश पेडणेकर तसेच श्री. सरगुरु, आनंद कांबळी, दाजी सावंत (वनराई) श्री. तेजम, पेडणेकर उपस्थित होते. प्रास्ताविक श्री. टकले यानी केले
यावेळी वनराई संस्था व एचडीएफसी बँक यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या डिजिटल वर्गाचे गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच शालेय बक्षिस वितरणाचा कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व वस्तु रुपात बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंना संस्था अध्यक्षानी दिलेल्या रक्कमेतुन शालोपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. मधुसुदन वस्त चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने शाळेतील मुलांना मोफत वह्यांचे वाटप बाळु वस्त यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी काकासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला तसेच सरगुरु, दाजी सावंत, सुरेश सावंत, प्रकाश पेडणेकर आदींनी मार्गदर्शन केले. चंद्रकांत हडकर यांनी श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी तर्फे शाळेतील दहावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्या प्रथम तीन क्रमांकाच्या मुलांना देण्यात येणाऱ्या बक्षीसाच्या रक्कमेमध्ये दुपटीने वाढ करण्याचे घोषित केले. विलास सावंत यांनी पाठविलेला संदेश वाचून दाखविण्यात आला. सूरेश सावंत यांनी माजी विद्यार्थी संघटना मुंबई यांच्या वतीने सन २५/२६ मध्ये दहावी परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बक्षिसे जाहीर केली.
गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी चिकाटी, ध्येय ठेवून अभ्यास करत तसेच स्पर्धा परीक्षाना सामोरे जावून तहसीलदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक सारख्या पदावर याच जिह्यामध्ये येण्याच्या द्रुष्टीने प्रयत्न करावा, असे आवाहन केले. तर अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी शाळा इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे व विशेषतः माजी विद्यार्थी संघटना मुंबई यांचे आभार मानले. शाळेचा सुवर्ण महोत्सव व कोरोनासारख्या संकट काळात सर्वांनी सहकार्य केल्याने, विशेषतः सुंदर सावंत, सुरेश सावंत व सहकारी यांच्या प्रयत्नांमुळेच सर्व शक्य झाल्याचे प्रभू यांनी सांगितले. सरपंच रुपेश पाटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री. जाधव व त्यांचे सहकारी शिक्षक बावकर, वसावे, आडे यांनी केले.











