खेड (प्रतिनिधी) : घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयडिया, इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि एंटरप्रेन्योरशिप (आयआयआयई) सेलतर्फे यावर्षी कोकणामध्ये प्रथमच सायकल रॅली अर्थात ‘सायक्लोथॉन’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. महाविद्यालय परिसरातून सुरू झालेली ही २० किलोमीटरची रॅली चिपळूण- कळंबस्ते मार्गावर पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये उद्योजकतेची जाणीव निर्माण करणे, आयडीयातून इनोव्हेशनकडे वाटचाल करण्यास प्रेरित करणे आणि तंदुरुस्त जीवनशैलीचा संदेश देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
नवोपक्रमाधिष्ठित विकासाच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत असा हा उपक्रम कल्पना निर्मितीपासून औद्योगिक साक्षात्कारापर्यंतच्या प्रवासाचे प्रतीक ठरला. स्टार्टअप्स, नवकल्पना आणि उद्योजकीय संधींबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या सायक्लोथॉनद्वारे प्रभावी संदेश देण्यात आला.
या रॅलीमध्ये महाविद्यालयातील २३ विद्यार्थ्यांनी तसेच २ प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आयआयआयई सेलचे प्रमुख डॉ. समीर गजमल यांनी यशस्वीरित्या केले. या उपक्रमासाठी एनएसएसचे प्रा. विनायक माळी व स्वयंसेवकांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील, रजिस्ट्रार प्रा. संदीप मुनघाटे तसेच सिक्युरिटी टीमचे मोलाचे योगदान लाभले. या अनोख्या सायक्लोथॉनमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम आणि उद्योजकतेबाबत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.












