महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा “मानाचा मजुरा, हटवूया कचरा” उपक्रम; किल्ले सुवर्णदुर्गावर शिवजयंतीनिमित्त जनजागृती कार्यक्रम

खेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांच्या स्वच्छता व संवर्धनासाठी “मानाचा मजुरा, हटवूया कचरा” हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि युनेस्कोने ऐतिहासिक दर्जा दिलेल्या राज्यातील ११ किल्ल्यांवर ही मोहीम राबवली जाणार असून, त्याअंतर्गत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन मोहिमेस सुरुवात होत आहे. सामाजिक संस्थांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम साकारला जाणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजता जय शिवराय प्रतिष्ठान, दापोली यांच्या वतीने आयोजित किल्ले सुवर्णदुर्ग येथील शिवजयंती उत्सवात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमास राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह, भा.प्र.से. यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमातून पर्यावरण रक्षण आणि ऐतिहासिक वारशाचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.
याच दौऱ्यादरम्यान दुपारी १२ वाजता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व सदस्य सचिव दापोली कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी हवामान बदल आणि कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने या विषयावर संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी २.३० वाजता लोटे परशूराम औद्योगिक वसाहत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर दापोली येथील हॉटेल फर्न येथे पर्यावरण विषयक चर्चा आयोजित करण्यात आली आहे.
या सर्व कार्यक्रमांचे वृत्तांकन करण्यासाठी मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने निमंत्रित करण्यात आले असून, पर्यावरण संवर्धनाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे व्यापक प्रसारण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.