सावंतवाडी : तालुक्यातील माजगाव खोतवाडा येथील दुचाकी चोरीची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त केली आहे. या प्रकरणी आरोपी रवी शंकर लाखे (वय ४०, रा. लाखेवस्ती, सावंतवाडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९.३० ते २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.४५ या कालावधीत फिर्यादी आदित्य गोविंद खोरजूवेकर (वय १९, रा. माजगाव खोतवाडा) यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेतून त्यांची सुझुकी कंपनीची एक्सेस (क्रमांक MH 07 AW 1048) ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरीस नेली होती. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार मनोज राऊत करीत असताना, पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर व पोलीस कॉन्स्टेबल पवन परब यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी रवी शंकर लाखे (वय ४०, रा. लाखेवस्ती, सावंतवाडी) याने ही दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने मोटारसायकल सावंतवाडी शहरातील बस स्थानकावर लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून ती जप्त केली.
या तपासकामात पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे व सुरेश पाटील यांनी सहकार्य केले असून आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
आरोपी रवी लाखे याने रात्री गाडी चोरी केली. त्यानंतर खोतवाडा ग्रामस्थांनी तत्काळ सीसीटीव्ही द्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी चोरटा पुन्हा माजगाव परिसरात दिसून आला तसेच तो सीसीटीव्हीतही कैद झाला होता. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली यानंतर पोलिसांची सूत्रे फिरली.











