सावंतवाडीत उद्यापासून ‘मालवणी करंडक’ महोत्सवाचा श्रीगणेशा

फूड फेस्टिवलसह १२ एकांकिकांची मेजवानी

सावंतवाडी । प्रतिनिधी : ओंकार कलामंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून उद्यापासून सावंतवाडी येथे ‘मालवणी करंडक’ महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला पालकमंत्री ना. नितेश राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

सावंतवाडीचा सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने आयोजित या महोत्सवात जिल्ह्यातील ज्येष्ठ कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये कै. आबा नेवगी यांच्या स्मरणार्थ सचिन धोपेश्वरकर (सावंतवाडी) व अंकुश कुंभार (कुडाळ), ज्येष्ठ रंगकर्मी दिनकर धारणकर यांच्या स्मरणार्थ सगुण पोळेकर (मालवण) व आनंद नार्वेकर (वेंगुर्ला) यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. तसेच शंकर बिद्रे यांच्या स्मरणार्थ भाई सामंत यांना विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या एकांकिका स्पर्धेत मुंबई, पुणे, गोवा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १२ संघ सहभागी होणार आहेत. केवळ सांस्कृतिक कार्यक्रमच नव्हे, तर स्थानिकांना आणि पर्यटकांना मालवणी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी ‘फूड फेस्टिवल’चेही आयोजन करण्यात आले आहे. मेजर जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर हा सोहळा रंगणार असून सावंतवाडीकरांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन समितीने केले आहे.

यावेळी अध्यक्ष अमोल टेंबकर, उपाध्यक्ष ऋजूल पाटणकर, दादा मडकईकर, भुवन नाईक, सचिन मोरजकर, हेमंत पांगम, प्रशांत सावंत, आनंद काष्टे, मृणाल पावसकर, साहिल सावंत, हर्ष जाधव, सावली पाटकर, भालचंद्र लांबर, प्रणव तारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.