रत्नागिरी :
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (MSEDCL) सौर ऊर्जा धोरणात अलीकडेच केलेल्या बदलांमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत ‘ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशन’ (AIREA) च्या वतीने राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांची भेट घेण्यात आली. यावेळी सौर उद्योजकांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करून या प्रश्नावर मार्ग काढण्याची विनंती केली.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन मिळावे आणि ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी प्रतिनिधींनी खालील मुद्दे मांडले:
• ऑटो अप्रूव्हल व्यवस्था: १० किलोवॅटपर्यंतच्या सौर प्रकल्पांसाठी पूर्वीप्रमाणे ‘ऑटो अप्रूव्हल’ची सुविधा पुन्हा सुरू करण्यात यावी.
• निर्यात व उत्पादन मर्यादा: प्रति किलोवॅट १०० युनिट निर्यात मर्यादा आणि १५० युनिट उत्पादन कॅपिंगचे निर्बंध शिथिल किंवा रद्द करावेत.
• दंडात्मक बिलिंग: १०० युनिटपेक्षा अधिक वीज निर्यात करणाऱ्या ग्राहकांवर लादलेले दंडात्मक बिलिंग तातडीने मागे घेण्यात यावे.
सध्याच्या निर्बंधांमुळे राज्यातील हजारो सौर ग्राहकांना आर्थिक मर्यादा येत असून, सौर ऊर्जा स्वीकारण्याच्या प्रक्रियेवर याचा परिणाम होत असल्याचे प्रतिनिधींनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच संयुक्त बैठक
ना. उदय सामंत यांनी सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे. या तांत्रिक अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संबंधित विभागाची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
उपस्थित मान्यवर
या बैठकीला ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष श्री. संजय व्यांशंपायन, ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनचे सदस्य श्री. वसीम नाईक, श्री. हृषिकेश कोंडेकर, श्री. ऋषिकेश कामटेकर, श्री. मकरंद झगडे, श्री. शैलेश मंझळ, श्री. शिफान फोंडू, श्री. रोहन आदी सदस्य उपस्थित होते.











