जिल्हा परिषदेकडून सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही
भोसले नॉलेज सिटीमधे ‘क्वांटेक्झेरा २०२६ ‘ चा शुभारंभ
सावंतवाडी । प्रतिनिधी : “सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे ही काळाची गरज आहे. तंत्रज्ञानच जिल्ह्याच्या प्रगतीचा खरा मार्ग आहे,” असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले. भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘क्वांटेक्झेरा २०२६’ या तांत्रिक महाउत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा, प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले आणि समन्वयक प्रा. सिद्धेश सावंत उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. रमण बाणे यांनी संस्थेच्या पहिल्या राष्ट्रीय महोत्सवामागची भूमिका स्पष्ट केली. “प्रत्येकासाठी शाश्वत तंत्रज्ञान” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून, कोकणच्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीला पूरक ठरतील, अशा तांत्रिक उपायांवर या उपक्रमात भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ले.कर्नल रत्नेश सिन्हा यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने अशा उपक्रमांची मालिका सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रमोद कामत यांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. जिल्ह्याच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा अंगीकार करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. याप्रसंगी संस्थेतर्फे त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
विविध स्पर्धांचा थरार
दोन दिवस चालणाऱ्या या महाउत्सवात टेक्निकल क्विझ, रोबो रेस, प्रोजेक्ट स्पर्धा, डिबेट आणि रील मेकिंग यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धकांमुळे परिसरात उत्साहाचे आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. दुपारच्या सत्रात पार पडलेल्या ‘मेगा ऑटो शो’ने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या महोत्सवात जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन संस्था आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असून, ‘क्वांटेक्झेरा २०२६’ हा जिल्ह्यातील तांत्रिक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शृंखला नाईक यांनी केले, तर आभार प्रा. सिद्धेश सावंत यांनी मानले.












