​स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेला ‘सक्शन व्हॅन’ प्राप्त

​नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले व  प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण

​सावंतवाडी | प्रतिनिधी  : “स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्राप्त झालेली ही सक्शन व्हॅन शहराच्या स्वच्छतेसाठी मैलाचा दगड ठरेल. यामुळे सांडपाण्याची विल्हेवाट लावणे अधिक सुलभ आणि आरोग्यदायी होईल,” अशी भावना सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केली.
‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत सावंतवाडी शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनामार्फत नगरपरिषदेला २,५०० लीटर क्षमतेची अत्याधुनिक सक्शन व्हॅन प्राप्त झाली असून, आज या वाहनाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
​शहराच्या स्वच्छता मोहिमेला गती देण्यासाठी आणि सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ही व्हॅन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

​ ​या नवीन सक्शन व्हॅनचा लोकार्पण सोहळा नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले आणि प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रारंभी, पुरोहितांच्या मंत्रोच्चारात वाहनाचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून ही व्हॅन शहरवासीयांच्या सेवेत अधिकृतपणे दाखल करण्यात आली.
​ ​या प्रसंगी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, तसेच नगरसेवक आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, देवा टेमकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, निलम नाईक, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, शर्वरी धारगळकर आणि ॲड. सायली दुभाषी उपस्थित होते.
​तर प्रशासनाच्या वतीने प्रशासकीय अधिकारी प्राची पाटील, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, अक्षय पंडित आणि नगरपरिषदेचे इतर कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.