महसूल सप्ताहाचा लाभ घ्या-जिल्हाधिकारी
रत्नागिरी : महसूल सप्ताहानिमित्त तालुक्यात मंडळ स्तरावर विविध दाखल्यांसाठी शिबिरे घेण्यात येऊन दोन दिवसात २ हजार ३३८ दाखले वितरीत करण्यात आले. युवा संवाद कार्यक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालयांमध्ये ७७३ दाखले वितरीत करण्यात आले तर, ७३६ विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यात आले आहे. महसूल सप्ताहाचा अधिका-धिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.
१ ते ७ ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात २ ऑगस्ट रोजी “युवा संवाद” या कार्यक्रमाचे महाविद्यालय तसेच शाळांमध्ये आयोजन करण्यात आले होते. जिल्हयातील ८१ महाविद्यालय व शाळांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला ९ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. या शिबीरांमध्ये विविध दाखल्यांसाठी १७५१ प्रकरणे तयार करण्यात आली. ७७३ दाखले वितरीत करण्यात आले व ७३६ विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यात आले. प्रत्येक तालुक्यात मंडळ स्तरावरही विविध दाखल्यांसाठी शिबिरे घेण्यात आली असून शिबिरांमध्ये १ व २ ऑगस्ट या दोन दिवसात एकूण २ हजार ३३८ दाखल्यांचे वितरण करण्यात आले.










