दोडामार्ग तालुक्यात २०२७ च्या जनगणनेची तयारी पूर्ण; १६ मे पासून पहिल्या टप्प्याला सुरुवात

दोडामार्ग:सुहास देसाई

केंद्र शासनाच्या गृह विभागामार्फत राबविण्यात येणारी ‘जनगणना २०२७’ यावेळी संपूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असून, दोडामार्ग तालुक्यात या राष्ट्रीय कार्यक्रमाची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. लोकसंख्या शास्त्र आणि विकास या दोन्ही दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.

​प्रशासकीय यंत्रणा आणि नियुक्त्या
​या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तालुक्यात विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे:
​ग्रामीण भाग (चार्ज अधिकारी): श्री. राहुल गुरव (तहसीलदार, दोडामार्ग)
​नगरपंचायत क्षेत्र (चार्ज अधिकारी): श्री. संकेत गायकवाड(मुख्याधिकारी, दोडामार्ग नगरपंचायत)​अतिरिक्त चार्ज अधिकारी: श्रीमती प्रज्ञा राजमाने ​नियोजन आणि प्रशिक्षण
​दोडामार्ग तालुक्याचे एकूण १०२ HLB (घर यादी गट) मध्ये विभाजन करण्यात आले आहे. या कामासाठी एकूण ८० प्रगणक आणि १२ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
​या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी महसूल नायब तहसीलदार श्री. संजय मद्रे आणि कृषी अधिकारी श्री. किशोर वाघमोडे यांची ‘प्रशिक्षक’ म्हणून नियुक्ती झाली आहे. प्रगणक व पर्यवेक्षकांचे हे विशेष प्रशिक्षण २३ एप्रिल ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आले आहे.

​२०२७ ची ही जनगणना दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात ‘घर यादी’ आणि ‘घर गणना’ हे काम हाती घेतले जाईल. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार असल्याने माहितीची अचूकता आणि वेग वाढण्यास मदत होणार आहे.

“जनगणना हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. १६ मे पासून आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना सर्व नागरिकांनी योग्य आणि अचूक माहिती देऊन सहकार्य करावे. देशाच्या भविष्यातील नियोजनासाठी ही माहिती अत्यंत मोलाची ठरणार आहे,” असे आवाहन दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.