सोशल मीडियावरील जाहिरातींमुळे मोठा आर्थिक फटका
दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली गुंतवणूक करून फसवणूक
पुण्यातील एका 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरला ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाला बळी पडून 20 लाखांहून अधिक रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. सोशल मीडियावरील जाहिरातींवर विश्वास ठेवून त्यांनी दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. सुरुवातीला काही परतावा मिळाल्याने त्यांचा विश्वास वाढला. मात्र नंतर कंपन्यांनी प्रतिसाद देणे बंद केल्याने फसवणूक उघड झाली. या प्रकरणी डेक्कन जिमखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पुणे : डेक्कन परिसरातील एका सॉफ्टवेअर इंजिनीअरला गेल्या वर्षी जून ते फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन शेअर ट्रेडिंग फसवणुकीत तब्बल 20 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित तंत्रज्ञ हा एका प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत असून, डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात या दोन्ही प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जून महिन्यात तंत्रज्ञाला सोशल मीडियावर राजकोटस्थित आर्थिक कंपनीची जाहिरात दिसली. त्यांनी त्या कंपनीची माहिती तपासून जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. एका महिलेने कॉल रिसीव्ह करून चांगल्या परताव्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी जून ते जुलैदरम्यान 3 लाख रुपये त्या कंपनीच्या खात्यात जमा केले.
नोव्हेंबरपर्यंत काही प्रमाणात परतावा मिळत होता, मात्र त्यानंतर तो थांबला. कंपनीच्या मालकाशी संपर्क साधल्यावर मार्च 2026 पर्यंत पैसे परत देण्याचे आश्वासन देण्यात आले, पण ते पूर्ण झाले नाही.
दरम्यान, याच काळात तंत्रज्ञाला दुसऱ्या स्टॉक मार्केट गुंतवणूक कंपनीची जाहिरात दिसली. त्यांनी पुन्हा संपर्क साधल्यावर दुसऱ्या एका महिलेने स्वतःला कंपनीची मालक असल्याचे सांगत आकर्षक नफ्याचे आमिष दाखवले. ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला कमी रक्कम गुंतवली असता एका महिन्यात 22,500 रुपयांचा नफा त्यांच्या खात्यात जमा झाला.
यानंतर विश्वास बसल्यामुळे त्यांनी टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम गुंतवली. फेब्रुवारीपर्यंत त्यांनी एकूण 18.71 लाख रुपये संबंधित खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. मात्र त्यानंतर नफा मिळणे बंद झाले आणि कंपनीकडून संपर्क तोडण्यात आला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान ही रक्कम तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील एका सार्वजनिक बँक खात्यात वळवण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









