दिवगंत उद्योजक प्रकाश कातकर यांचा २८ एप्रिल रोजी प्रथम स्मृतिदिन कार्यक्रम

 ‘राजापूरचा प्रकाशदाता’ पुस्तकाचे होणार प्रकाशन

राजापूर (वार्ताहर): राजापूर प्रतिष्ठानचे संस्थापक, प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक, शैक्षणिक व बँकिंग क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्व कै. प्रकाश कातकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मंगळवार, २८ एप्रिल २०२६ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘राजापूरचा प्रकाशदाता’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.

राजापूर प्रतिष्ठान, राजापूर यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम स्थानिक ‘कलामंदिर, राजापूर हायस्कूल’ येथे सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत कै. प्रकाश कातकर यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यासाठी या चरित्र ग्रंथाची निर्मिती करण्यात आली असून, श्री. जगदीश पवार यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.

या कार्यक्रमाला आमदार किरण सामंत, नायब तहसीलदार सौ. दिपाली पंडीत, पोलीस निरीक्षक अमित यादव, लुमी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर योगेश व्यास, जिजाऊ संस्थेचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर, राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाहच्या अध्यक्षा डॉ. छाया जोशी, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, श्रीमती संपदा प्रकाश कातकर, बालसाहित्यिक मदन हजेरी आणि बांधकाम व्यवसायिक गदगू जाधव यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजापूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन पाडावे, कार्याध्यक्ष सुधीर विचारे, सचिव राजू काशिंकर, खजिनदार गोपाळ गोंडाळ आणि सर्व कार्यकारी मंडळ व सदस्य यांनी केले आहे