सावंतवाडी :
वेत्ये येथील काळा दगड खाणीतील अनधिकृत उत्खननाबाबत तक्रार केल्याच्या रागातून बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर व निगुडे येथील महेश सावंत यांना खाण मालकांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर आज फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात बाबुराव तेंडोलकर, सुभाष राणे आणि प्रभाकर राणे या तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
.
वेत्ये येथील काळा दगड खाणीत बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने नागपूर येथील खाण विभागाचे अधिकारी आणि स्थानिक क्षेत्रफळ मंडळ अधिकारी मोजमापासाठी खाणीत आले होते. यावेळी तक्रारदार साईप्रसाद कल्याणकर आणि महेश अंकुश सावंत हे देखील उपस्थित होते.
शासकीय अधिकारी मोजमाप घेत असतानाच, तक्रार केल्याचा राग मनात धरून खाण मालक बाबुराव तेंडोलकर, शेजारील खाण मालक सुभाष राणे आणि प्रभाकर राणे यांनी तक्रारदारांवर हल्ला चढवला. तेंडोलकर यांनी खाणीतील डंपर बोलावून तक्रारदारांच्या कारच्या पुढे आणि मागे आडवे लावले, ज्यामुळे कार्यकर्त्यांना बाहेर पडता येऊ नये अशी व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या कारवर ठोसे मारून नुकसान करण्यात आले आणि त्यांचा मोबाईल हिसकावून घेत फोडून टाकला. तर महेश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गाडीतून ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. सुभाष राणे यांनी दगड उगारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तर राणे यांनी चपलेने मारहाण केली. तसेच तेंडोलकर याने मोटारसायकलमधील पेट्रोल काढून “संध्याकाळनंतर येथे थांबलात तर गाडी पेटवून देऊ” अशी धमकी दिली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सागर राणे, जितू गांवकर आणि गुणाजी गावडे यांनी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.
या हल्ला केल्यानंतर तेंडोलकर यांनी बेकायदेशीरपणे बॉण्ड पेपर आणले. यापुढे आम्ही कोणतीही तक्रार करणार नाही, असे त्यावर लिहून घेऊन कार्यकर्त्यांच्या जबरदस्तीने सह्या घेण्यात आल्याचे तक्रारदारांनी फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी १ मे रोजी प्राथमिक तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्यानंतर आज, ६ मे रोजी साईप्रसाद कल्याणकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात हजर राहून आपला सविस्तर जबाब नोंदवला. पोलिसांनी या तक्रारीवरून बाबुराव तेंडोलकर, सुभाष राणे आणि प्रभाकर राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार तथा बीट अंमलदार हनुमंत धोत्रे करत आहेत.












