सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर उभारण्यात येत असलेल्या भव्य क्रीडा संकुलाच्या कामाची माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रकल्पाच्या कामाची गती आणि गुणवत्ता जाणून घेण्यासाठी त्यांनी हा दौरा केला. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाहणी दरम्यान आमदार केसरकर यांनी क्रीडा अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशी सविस्तर चर्चा केली. मैदानाचे काम कुठपर्यंत आले आहे आणि आराखड्यानुसार सुविधांची निर्मिती होत आहे का, याचा तांत्रिक आढावा त्यांनी घेतला. हे संकुल परिपूर्ण व्हावे, यासाठी त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या.
पाहणीनंतर बोलताना आमदार केसरकर म्हणाले की, “या संकुलात इनडोअर आणि आऊटडोअर अशा दोन्ही प्रकारच्या खेळांची उत्तम सोय असेल. सावंतवाडीतील मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी नगरपालिका आणि प्रशासन मिळून प्रयत्न करत आहोत. हे एक आदर्श क्रीडा संकुल म्हणून नावारूपास येईल.”
या पाहणी दौऱ्याप्रसंगी राजघराण्याचे युवराज लखमराजे भोंसले, क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगावकर, नगरसेविका सुनिता पेडणेकर यांची उपस्थिती होती.
तसेच प्रशासकीय पातळीवर जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, सार्वजनिक बांधकाम अभियंता पूजा इंगवले, न.प. अभियंता तुषार सरडे, उप अभियंता सीमा गोवेकर, अर्चित पोकळे, प्रसाद नार्वेकर आदी अधिकारी कामाची माहिती देण्यासाठी उपस्थित होते.
Home सिंधुदुर्ग सावंतवाडी सावंतवाडी जिमखाना मैदान क्रीडा संकुलाच्या कामाची आ. दीपक केसरकरांकडून पाहणी












