पावसाळ्यापूर्वी योग्य ती खबरदारी घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
सावंतवाडी । प्रतिनिधी :
पावसाळा अगदी तोंडावर आलेला असतानाही येथील पादचारी मार्गाचे (फूटपाथ) काम अजूनही पूर्णत्वास आलेले नाही. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष तथा विरोधी नगरसेवक संजू परब यांनी या कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान फूटपाथखालील सिमेंटचे पाईप अत्यंत जीर्ण झाल्याचे दिसून आल्याने, त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेऊनच पुढील काम करावे, अशी महत्त्वाची सूचना त्यांनी नगरपरिषद बांधकाम अधिकाऱ्यांना केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत स्थानिक नगरसेवक देव्या सूर्याजी हेदेखील उपस्थित होते.
येथील प्रसिद्ध मोती तलावाच्या काठावर पादचारी मार्ग बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामाच्या संथ गतीबद्दल आणि गुणवत्तेबद्दल संजू परब यांनी चिंता व्यक्त करत न.प. बांधकाम अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले. आगामी पावसाळ्यात या परिसरात किंवा मुख्य रस्त्यावर कुठेही पाणी तुंबणार नाही आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची पूर्ण दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे त्यांनी बजावले.
दरम्यान, स्थानिक नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी या मार्गावरील झाडांच्या समस्येकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. पूर्वी वादळात या फूटपाथवरील अशोकाची काही झाडे उन्मळून पडली होती. त्या रिकाम्या झालेल्या जागेवर योग्य नियोजन करून पुन्हा नवीन वृक्षलागवड करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सध्या अस्तित्वात असलेली अशोकाची झाडे आगामी पावसाळ्यातील वादळी वाऱ्यामुळे कोसळू नयेत, यासाठी वन विभाग आणि नगरपरिषदेने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही सूर्याजी यांनी केली.
या पाहणी दौऱ्यादरम्यान नगरपरिषद बांधकाम विभागाचे अभियंता तुषार सरडे, मनोज राऊळ यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून पावसाळ्यापूर्वी हे काम व्यवस्थित पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले.












