मळगाव येथील सकल हिंदू संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी । प्रतिनिधी : अमुक एका जातीची ओळख जपण्यात न अडकता केवळ हिंदू म्हणून जगणे हीच काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण एकत्र आहोत, तोपर्यंतच आपण सुरक्षित आहोत त्यामुळे जात-पात विसरून केवळ हिंदू म्हणून जगा, असे ठाम प्रतिपादन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी येथे केले. मळगाव दशक्रोशी येथील सकल हिंदू संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
हिंदू बांधवांमध्ये एकजूट निर्माण व्हावी, धर्मजागृती व्हावी आणि भावी पिढीपर्यंत संस्कार पोहोचावेत, या उद्देशाने हिंदू संमेलन समन्वय समिती मळगाव दशक्रोशी यांच्या वतीने मळगाव येथील शालू मंगल कार्यालय येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला परिसरातील हिंदू बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलन, शिवप्रतिमा व भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख वक्ते डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, प्रमुख अतिथी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह. भ. प. लक्ष्मण कडव, हिंदू संमेलन समन्वय समितीचे संयोजक ह.भ.प. शेखर पाडगावकर, सहसंयोजिका रंजना तेली, महेश पंतवालावलकर, हेमंत खानोलकर, भगवान रेडकर, मनीषा नाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. ठाकरे आणि प्रमुख पाहुणे लक्ष्मण कडव यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
*धर्मसंरक्षणाची सुरुवात गावापासून व्हावी : डॉ. ठाकरे*
मार्गदर्शन करताना डॉ. प्रवीणकुमार ठाकरे म्हणाले की, धर्मसंरक्षणाची सुरुवात आपल्या स्वतःच्या गावापासूनच झाली पाहिजे. समाजात वाढणाऱ्या अपप्रवृत्तींपासून आपल्या मुलींचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक कुटुंबाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेल्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांनी विविध उदाहरणांतून उपस्थितांसमोर स्पष्ट केली. यावेळी त्यांनी ‘नागरिक मी या देशाचा’ या कवितेचे वाचन करत, आजच्या समाजातील नागरिकांच्या अपेक्षा आणि त्यांच्या कृतीतील विसंगती यावर नेमकेपणाने बोट ठेवले. भाषणाच्या समारोपात त्यांनी उंदराच्या एका रूपककथेतून “एकत्र राहिलो तरच सुरक्षित राहू”, हा मोलाचा संदेश दिला.
*भगवद्गीता प्रत्येक घरात असावी : लक्ष्मण कडव*
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संयोजक शेखर पाडगावकर यांनी जात-पात विसरून केवळ हिंदू म्हणून जगण्याचे आवाहन केले. तर प्रमुख अतिथी लक्ष्मण कडव यांनी भगवद्गीतेचे जीवनातील महत्त्व विशद केले. प्रत्येक हिंदूच्या घरात भगवद्गीता असायलाच हवी आणि तिचे नियमित वाचन व्हायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
*सांस्कृतिक कार्यक्रम आणि शस्त्र प्रदर्शन*
संमेलनाची सुरुवात नावनोंदणी व अल्पोपहाराने झाली. यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गायक हेमंत गोडकर व मुग्धा पंतवालावलकर यांचे सुगम संगीत, अंकुश आजगावकर यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा, तसेच हर्षिता राऊळ व खुशी लातये यांचे मर्दानी लाठी-काठीचे थरारक प्रात्यक्षिक सादर झाले. याशिवाय, दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून इतिहासप्रेमी ज्ञानेश्वर राणे यांनी शिवकालीन शस्त्रे व पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरवले होते, ज्याचा उपस्थितांनी लाभ घेतला.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचा आणि सहकाऱ्यांचा श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा नाटेकर-राऊळ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रंजना तेली यांनी मानले. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी हिंदू संमेलन समन्वय समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.












