शिपोशी विद्यामंदिर च्या माजी विद्यार्थी विचार मंचा’च्या वतीने स्पर्धेची घोषणा
लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांच्या हिरवीगार कुशीत १५ नोव्हेंबर रोजी ‘सह्याद्री मॅरेथॉन स्पर्धा होणार असल्याची घोषणा शिपोशी विद्यामंदिर च्या माजी विद्यार्थी विचार मंचा’च्या वतीने पुणे येथे स्पोर्टझीला कार्यालयात करण्यात आली.
लांजा तालुक्यातील शिपोशी येथील वै. वि. आठल्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर शिपोशी’च्या माजी विद्यार्थी विचार मंचा’च्या वतीने सह्याद्री मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा नेमकी कधी होणार याबाबतची घोषणा करण्यात आलेली नव्हती. मात्र आता ही स्पर्धा 15 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा हि विविध वयोगटातील धावपटूंसाठी ५ किमी, १० किमी आणि २१.०९७५ किमी (हाफ मॅरेथॉन) अशा रोमांचक अंतरांची स्पर्धा असणार आहे.
मराठी शाळा,भाषा आणि पर्यावरण संकल्पना घेऊन एक पाऊल पुढे टाकण्यात येत आहे.
या मॅरेथॉनद्वारे सह्याद्रीच्या सौंदर्यातून प्रेरणा घेऊन स्थानिक तरुणांना व्यायामाची सवय लावली जाईल. स्पर्धेच्या माध्यमातून आरोग्य जागृती, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल. सहभागी धावपटूंना आकर्षक रोख बक्षिसे, पदक, प्रमाणपत्रे आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच २०२६ पासून ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. सर्व वयोगट, लिंग आणि पार्श्वभूमीतील धावपटूंना सहभागाचे आमंत्रण आहे. शिपोशीच्या या मॅरेथॉनमुळे युवक युवती मैदानी खेळांकडे आकर्षित होऊन सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील धावण्याची परंपरा कायम राहील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे
दरम्यान स्पर्धेची तारीख घोषित करताना
माजी विद्यार्थी विचार मंच अध्यक्ष यशवंत बाईंग , स्पोर्टझीला कंपनीचे नितीन जोशी, शाळा कट्टा ९०/९१ समूहाचे तथा माजी विद्यार्थी श्री दत्तप्रसाद कोलते,दीपक नागवेकर,राजेंद्र दळवी,संजय शिंदे,अरविंद तरळ,प्रकाश कडू, विवेक पावस्कर आणि चंद्रकांत तरळ उपस्थित होते.
______________________________________













