२८ जून रोजी ‘वृक्षारोपण २०२६’ मोहिमेचा शुभारंभ
संगमेश्वर:
वाढते तापमान आणि पर्यावरणाचा समतोल बिघडत चालल्याच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे ग्रामस्थांनी एक कौतुकास्पद आणि आश्वासक पाऊल उचलले आहे. येत्या रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता हायवे, तळेकांटे येथून या पर्यावरणपूरक मोहिमेचा जंगी शुभारंभ होणार असून सामूहिक वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
तळेकांटे च्या सरपंच सुषमा संदीप बने यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे चारपदरी सिमेंट कॉंक्रिटीकरण झाल्यामुळे परिसरातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. एप्रिल-मे महिन्यात तापमान ४० ते ४५ अंशांपर्यंत पोहोचत असून विहिरी, बोअरवेल आटत चालल्या आहेत. या गंभीर समस्येवर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष ‘रचनात्मक कृती’ करण्यासाठी तळेकांटे ग्रामस्थांनी एकत्र येत आगामी पावसाळ्यात भव्य वृक्षारोपण करण्याचा निर्धार केला आहे. ‘एक झाड… एक आठवण’ या संकल्पनेतून येत्या रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता हायवे, तळेकांटे येथून या पर्यावरणपूरक मोहिमेचा जंगी शुभारंभ होणार आहे.
गावातील मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त एकत्र आलेल्या ग्रामस्थांनी या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. तळेकांटे गावाची लोकसंख्या साधारण हजाराहून पंधराशेच्या आसपास असून, संपूर्ण गावाने मिळून सहजपणे २ हजार झाडे लावण्याचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवले आहे. या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात मुंबई-गोवा महामार्गावरील सप्तरंगी पुलापासून ते बावनदी पुलापर्यंतच्या साधारण ४ किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केले जाणार आहे. यामध्ये केवळ सावली देणारीच नव्हे, तर जमिनीतील पाणी धरून ठेवणारी, पक्ष्यांना आश्रय देणारी आणि वातावरण थंड ठेवणारी वड, पिंपळ, चिंच आणि उंबर यांसारखी पारंपारिक व भारतीय वंशाची मोठी झाडे लावण्यावर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे.
या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याला दिलेले कौटुंबिक आणि भावनिक स्वरूप. वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजेच २८ जून रोजी होणाऱ्या या उपक्रमाला गावाने एका ‘पावसाळी सहलीचे’ आणि आगळ्यावेगळ्या ‘गेट टुगेदर’चे स्वरूप दिले आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून गावाकडे आलेले चाकरमानी, गावातील स्थानिक नागरिक, लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ मंडळी सर्वजण एकत्र येऊन पावसात भिजत झाडे लावणार आहेत. तसेच या निमित्ताने धबधब्याखाली मजा करणे आणि नदीच्या माशांवर ताव मारणे असा निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेण्याचा बेतही आखण्यात आला आहे. आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला शुद्ध हवा आणि जिवंत निसर्ग मिळावा, तसेच भविष्यात मुलांनी ‘ही झाडे आम्ही तुमच्यासाठी लावली होती’ असे अभिमानाने सांगावे, या उदात्त हेतूने हा संपूर्ण सोहळा पार पडणार आहे.
निर्मल ग्रुप आणि ग्रामपंचायत तळेकांटे यांच्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेत प्रत्येकाला आपल्या प्रिय व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त, स्मृतीदिनानिमित्त, श्रद्धांजली किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एक झाड’ लावून ती भावना जपता येणार आहे. तळेकांटे गावातील ग्रामस्थ, माहेरवाशिणी आणि हितचिंतक आपल्या प्रियजनांच्या स्मरणार्थ झाडे लावून त्यांची आठवण चिरंतन ठेवू शकतात. आज लावलेले एक झाड उद्याचा हिरवा वारसा बनणार असल्याने, अधिकाधिक लोकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन ‘तळेकांटे ग्रामस्थ, ता. संगमेश्वर’ यांच्या वतीने करण्यात आले आहे. या महामोहिमेत सहभागी होण्यासाठी किंवा झाडे देण्यासाठी ८७८८७३०९४६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सरपंच सुषमा संदीप बने यांनी केले आहे.













