साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त
बांदा : प्रतिनिधी
बांदा पोलीस चेक नाका येथे आज पहाटेच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारूसह एकूण ४ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सावंतवाडी येथील सुधीर खुबू राठोड (२८) याच्या विरोधात बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास बांदा पोलीस चेक नाका येथे वाहनांची तपासणी सुरू होती. यावेळी तेथून जाणाऱ्या कारची झडती घेण्यात आली. कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारुसाठा निदर्शनास आला.
या कारवाईत १ लाख ५९ हजार ६०० रुपयांची दारू व सुमारे ३ लाख रुपयांची कार असा एकूण ४ लाख ५९ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अधिक तपास महिला हेड कॉन्स्टेबल माळकर करत आहेत.













