पाच वर्षांपूर्वीच्या ‘अपघाती मृत्यू’ प्रकरणाला खुनाचे वळण

चौघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

 

कणकवली | प्रतिनिधी : फोंडाघाटात दरीत तरुणाचा मृतदेह व दुचाकी आढळून आलेल्या आणि अपघाती मृत्यू म्हणून नोंद झालेल्या पाच वर्षांपूर्वीच्या प्रकरणाला आता खुनाचे धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

कणकवली पोलिसांच्या पथकाने घाटकोपर क्राईम ब्रँचच्या ताब्यातून मनोज नारायण भंडगे (४३, नवी मुंबई), सुरेंद्र चंद्रहास सोनवडेकर (४०, खालापूर-रायगड), अतिष भगवान मोरे (३९, ठाणे) आणि ऋतूराज रविंद्र शेट्टी (३१, ठाणे) यांना शुक्रवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यात आणले. न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

 

मृत अशपाक उर्फ निहाल राजशवल्ली मुलाणी (वय २५, सोलापूर) याचा मृतदेह २८ डिसेंबर २०२१ रोजी फोंडाघाटातील दरीत आढळला होता. त्यावेळी मृतदेहाजवळ त्याची दुचाकीही असल्याने हा अपघात असल्याचे मानून पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनंतर या प्रकरणाचा तपास नव्याने सुरू झाला.

 

दारूच्या नशेत उघड झाला गुन्हा

 

घाटकोपर क्राईम ब्रँचला दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत या घटनेबाबत माहिती दिल्याचे समजते. त्यानंतर संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत अशपाकचा अपघात नव्हे तर सहा जणांनी मिळून खून केल्याचे उघड झाले.

 

आर्थिक वादातून मारहाण

 

पोलीस तपासानुसार, डिसेंबर २०२१ मध्ये संशयित आणि अशपाक हे सिंधुदुर्गात वास्तव्यास होते. मालमत्ता व्यवहार व कर्जपुरवठ्याशी संबंधित कामासाठी ते येथे आले होते. कुडाळ येथील हॉटेल ओंकार डिलक्समध्ये त्यांचा मुक्काम होता.

 

४ डिसेंबर २०२१ रोजी अशपाक हॉटेलमध्ये परतला. त्यावेळी संशयित मद्यपान करत होते. आर्थिक व्यवहाराच्या वादातून अशपाकला लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर सर्वजण झोपले. पहाटे अशपाक बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आल्याचे तपासात समोर आले आहे.

 

मृतदेह दरीत फेकून अपघाताचा बनाव

 

अशपाकचा मृत्यू झाल्यानंतरही संशयितांनी दिवसभर मृतदेह हॉटेलमध्येच ठेवला. रात्री उशिरा मृतदेह चादरीत गुंडाळून इनोवा कारमधून फोंडाघाटात नेण्यात आला. त्याचबरोबर अशपाकची दुचाकीही नेण्यात आली. त्यानंतर मृतदेह आणि दुचाकी दरीत फेकून अपघाताचा बनाव रचण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

आणखी दोघांच्या अटकेची शक्यता

 

या गुन्ह्यात आणखी दोन संशयितांचा सहभाग असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दिली असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, या बहुचर्चित प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी आता कणकवली पोलिसांवर असून खुनामागील नेमके कारण उघड करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.