सवलतीच्या एसटी पाससाठी नवी प्रक्रिया लवकरच
कणकवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या प्रवासी पाससाठी RuPay ON THE GO, NCMC Enabled कार्ड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील सर्व आगारांमध्ये नोंदणी व वितरण प्रक्रिया राबविण्यात येणार असून, लवकरच विद्यार्थ्यांच्या NCMC कार्ड नोंदणीला सुरुवात होणार आहे.
एसटी महामंडळाकडून विविध सवलतधारक तसेच विनासवलतधारक प्रवाशांना NCMC Enabled कार्ड देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी, देखभाल व वितरण हे काम एसटी महामंडळ, ईक्वस टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि NSDL Payments Bank यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. सध्या राज्यातील सर्व आगारांमध्ये कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू आहे.
१६ फेब्रुवारी २०२६ पासून ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांच्या NCMC कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या पाससाठी NCMC कार्ड नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
महामंडळाच्या माहितीनुसार, शालेय शिक्षण तसेच तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरल (SARAL) किंवा APAAR क्रमांकाशी संलग्न NCMC Enabled कार्ड देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा सरल किंवा APAAR क्रमांक आधार क्रमांकाशी जोडलेला असणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना मासिक पाससाठी आवश्यक असलेला अर्ज एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. अर्जातील माहिती व आवश्यक कागदपत्रे शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्रमाणित करून संबंधित आगारातील वाहतूक नियंत्रक किंवा अधिकृत एजंटकडे सादर करावी लागतील. पडताळणीनंतर विद्यार्थ्यांची NCMC कार्ड नोंदणी करण्यात येणार आहे.
कार्ड नोंदणीसाठी विद्यार्थी अथवा पालकांचा मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक राहणार असून, आवश्यक शुल्क भरल्यानंतर पावती देण्यात येईल. नोंदणीनंतर सुमारे ३० दिवसांच्या कालावधीत कार्ड छापून संबंधित आगारात उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर POS मशीनद्वारे कार्ड सक्रिय करून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
चौकट
विद्यार्थ्यांसाठी NCMC कार्डसाठी आवश्यक बाबी –
सरल (SARAL) किंवा APAAR क्रमांक आवश्यक क्रमांक आधारशी संलग्न असणे बंधनकारक.
शाळेच्या मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
विद्यार्थी किंवा पालकांचा मोबाईल क्रमांक अनिवार्य आहे.
अर्ज एसटीच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहे.
नोंदणीनंतर सुमारे ३० दिवसांत कार्ड उपलब्ध होणार.
POS मशीनद्वारे कार्ड सक्रिय करण्यात येणार आहे.










