दोडामार्ग तालुका पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न
दोडामार्ग : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये भरपूर टॅलेंट आहे. मात्र जिल्ह्यात रोजगाराच्या संधी कमी असल्याने हुशार विद्यार्थी मुंबई, पुणे यासारख्या शहरांकडे वळतात. येत्या तीन – चार वर्षात जिल्ह्यातच गुणवत्तेनुसार चांगल्या दर्जेदार नोकऱ्या देण्याची जबाबदारी माझी आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांनी यश संपादन करून जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दोडामार्ग येथे केले.
दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या वतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मणेरी येथील वेदांत हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ना. नितेश राणे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती घोडमीसे, दोडामार्ग सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, साक्षी तळवडेकर, पंचायत समिती सदस्य सायली निंबाळकर, संजय सातार्डेकर, सोनिया कुबल, जिल्हा पत्रकार संघांचे कार्यकारी सदस्य सुहास देसाई, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, ठाकरे सेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, उपस्थित होते.
ना. नितेश राणे म्हणाले, दोडामार्ग तालुका आणि राणे कुटुंबीयांचे नाते कायम जिव्हाळ्याचे राहिले आहे. खासदार नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी दोडामार्ग तालुक्याची निर्मिती केली. मोपा विमानतळ नजीक असल्याने तालुक्याच्या विकासाला भरपूर वाव आहे. सर्वात वेगवान विकसित होणारा तालुका म्हणून भविष्यात दोडामार्ग तालुक्याचा लौकिक होईल.
आडाळी एमआयडीसीमध्ये येत्या काही काळात दर्जेदार नोकऱ्या देणारे कारखाने येतील. दरवर्षी निवडणुकांवेळी गोवा मुख्यमंत्र्यांना मतदानासाठी आमच्या भागातील युवकांना सुट्टी देण्याची विनंती करावी लागते. ही आमच्या मनात खंत आहे. भविष्यात जिल्ह्यातच सर्व युवकांना नोकऱ्या देण्याचा माझ्या प्रयत्न आहे. जिल्ह्यातच राहून दर्जेदार नोकरी करण्यासाठी तयार राहा. सुरू होणारे प्रकल्प समजून घ्या. त्यासाठी आमच्याबरोबर संवाद ठेवा, असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना युवकांना विचलित करणाऱ्या अनेक बाबी आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत करा असे आवाहन केले. प्रमोद कामत यांनी विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व परिश्रम करण्याची कायम तयारी ठेवा, असे सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रत्नदीप गवस यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तेजस देसाई यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोडामार्ग तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, प्रशालेचे शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











