१८ जूनपासून शहरात ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा
देवरूख (प्रतिनिधी)
यंदा १५ जून उलटूनही मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने वाढत्या उष्णतेचा परिणाम थेट पाणीसाठ्यावर झाला आहे. धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असल्याने देवरूख नगरपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १८ जून २०२६ पासून देवरूख शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा नगरपंचायत प्रशासनाने केली आहे.
वाढत्या उष्णतेमुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, धरणसाठ्यातील पाणी पातळीत लक्षणीय घट झाली आहे. नगरपंचायत प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेतला असता, धरणातील पिण्याच्या पाण्याचा साठा मर्यादित असल्याचे समोर आले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार, गुरुवार दि.१८ जूनपासून शहरात नेहमीच्या वेळेप्रमाणेच पाणीपुरवठा केला जाईल, मात्र तो ‘एक दिवसाआड’ असेल. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापती व प्रशासनाच्या चोख आणि दूरदृष्टी नियोजनामुळे यंदाचा कडक उन्हाळा संपूनही देवरुखकरांना पाणीटंचाई जाणवली नाही. पाण्याचे चोख व्यवस्थापन केल्यामुळे मे महिन्यातही पाणीकपात करावी लागली नाही.
परंतु, यंदा १५ जून उलटूनही पावसाने दडी मारल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तूर्तास एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. याबाबत प्रसारमाध्यमे आणि घंटागाडीद्वारे शहरात जाहीर सूचना देण्यात येणार आहेत. पाण्याची कमतरता आणि जून महिन्यातील पावसाचा अंदाज पाहता, नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून आणि काटकसरीने करावा व पाणी टंचाईच्या या काळात नगरपंचायतीला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन प्रशासन, नगराध्यक्षा मृणाल शेटये, उपनगराध्यक्ष वैभव पवार व पाणीपुरवठा सभापती यशवंत गोपाळ तसेच सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. त्याचबरोबर नळाचे पाणी वाहने धुण्यासाठी वापरू नये, बांधकाम कामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा, बागेसाठी नळाचे पाणी वापरू नये असे कडक निर्देश देखील दिले आहेत.
नगरपंचायत प्रशासनाच्या असेही निर्दशनास आले आहे की, काही व्यक्ती धरणावरील प्लेट्स उचलून अथवा धरणाच्या संरचनेशी छेडछाड करून पाण्याचा प्रवाह बदलत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असून नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. धरणावरील प्लेट्स, गेट्स, झडपा, पाईपलाईन किंवा इतर कोणत्याही यंत्रणेशी छेडछाड करणे हा गंभीर व दंडनीय प्रकार आहे.धरण परिसरात विनापरवानगी प्रवेश करणे, पाण्याचा प्रवाह बदलणे अथवा पाणी वाया जाईल असे कोणतेही कृत्य केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ व भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे निर्देश मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिले आहेत.












