Buldhana: बुलढाण्यात नकली नोटांच्या टोळीचा पर्दाफाश; मलकापूर पोलिसांची मोठी कारवाई!

 

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. कमी पैशांत जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या टोळीचा मलकापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. केवळ ३५ हजार रुपयांच्या बदल्यात साडेतीन लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून लूटमार करण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली. त्यांच्या ताब्यातून ‘चिल्ड्रन्स बँक’च्या तब्बल ६९९ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

 

पैशांचा मोह माणसाला कुठल्या थराला घेऊन जाऊ शकतो, याचे ज्वलंत उदाहरण बुलढाण्यातील मलकापूर येथे पाहायला मिळाले. हैदराबादहून आलेल्या काही व्यक्तींनी ३५ हजार रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात साडेतीन लाख रुपयांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवत लूटमार करण्याचा कट रचला होता.

 

मात्र, या प्रकाराची गोपनीय माहिती मलकापूर शहर पोलिसांना आधीच मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी शहरात सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत ईश्वर अशोक मेहसरे (वय ३४) आणि गौतम मुकुंदा तायडे (वय २२) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

 

झडतीदरम्यान पोलिसांना मोठा धक्का बसला. संशयितांकडून ‘चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया’ असे छापलेल्या ५०० रुपयांच्या तब्बल ६९९ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. याशिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक मोटारसायकल आणि चार मोबाईल फोन असा एकूण ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई केली. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.