संगमेश्वर तालुक्यात ऑनलाईन भामट्यांचा सुळसुळाट; माखजन बाजारपेठेतील बूट विक्रेत्याला ३८ हजारांचा गंडा

गेल्या १५ दिवसांतील तिसरी मोठी फसवणूक; संगमेश्वर पोलीसांत अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे सत्र थांब नाव घेताना दिसत नाहीये. गेल्या अवघ्या १५ दिवसांत तालुक्यात ऑनलाईन फसवणुकीची ही तिसरी घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. ताज्या घटनेत माखजन बाजारपेठेतील एका फूटवेअर (बूट-चप्पल) विक्रेत्याला ऑनलाईन भामट्याने तब्बल ३८,००० रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

​याप्रकरणी संतोष यशवंत सावर्डेकर (वय ४४ वर्षे, रा. माखजन रोहीदसावाडी, ता. संगमेश्वर) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून, अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस डायरीतील माहितीनुसार, ही फसवणुकीची घटना दिनांक २५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.०० ते रात्री ९.०० वाजण्याच्या सुमारास माखजन बाजारपेठ येथील सावर्डेकर यांच्या फूटवेअर दुकानात घडली. अज्ञात आरोपीने फिर्यादी संतोष सावर्डेकर आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ (शाखा माखजन) येथील जॉईंट अकाउंटमधून २,००० रुपये आणि सावर्डेकर यांच्या ‘जनता सहकारी बँक’ खात्यामधील १२,००० रुपये असे एकूण १४,००० रुपये आधी त्यांच्याच दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर सावर्डेकर यांच्या संमतीशिवाय एकूण ३८,००० रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढून घेत त्यांची फसवणूक केली.
​
​फिर्यादी संतोष सावर्डेकर यांचे शिक्षण ८ वी पर्यंत झाले असून ते माखजन येथे व्यवसाय करतात. त्यांची कोणतीही संमती नसताना किंवा गुप्त माहिती शेअर केलेली नसतानाही त्यांच्या खात्यातून पैसे गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या १५ दिवसांत संगमेश्वर तालुक्यात झालेली ही तिसरी ऑनलाईन फसवणूक असल्याने, सायबर गुन्हेगार ग्रामीण भागातील निष्पाप नागरिकांना आपले लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे. याप्रकरणी १९ जून २०२६ रोजी रात्री २१.२२ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४), माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) (भा.द.वि. कलम ४२०) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. नागरिकांनी आपल्या बँकेचे डिटेल्स, ओटीपी किंवा संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नये. कोणतीही ऑनलाईन फसवणूक झाल्यास तातडीने सायबर सेल किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.